जळगाव -केंद्र सरकारने आता सुवर्ण अलंकारांसाठी एचयुआयडी अर्थात 'हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन डिजिट'ची सक्ती केली आहे. ही प्रक्रिया जाचक असल्याचा आरोप करत देशभरातील सराफ व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारने हॉलमार्किंगची एचयुआयडी प्रक्रिया तातडीने रद्द करावी, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि. 23 ऑगस्ट) सराफ व्यावसायिकांनी राज्यव्यापी लाक्षणिक बंद पुकारला आहे. जळगाव जिल्ह्यातील सुमारे 2 हजार सराफ व्यावसायिक या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. दरम्यान, 'केंद्र सरकार जाचक अटी व शर्थी आणत असल्याने सराफ व्यवसाय धोक्यात येण्याची भीती आहे. व्यवहारात सोपी व सुटसुटीत प्रक्रिया आणण्याऐवजी केंद्र सरकार आमच्या अडचणीत वाढवत असून आम्हाला मुनीम बनवू पाहत आहे', असा आरोप करत जळगावातील सराफ व्यावसायिकांनी केंद्र सरकारच्या भूमिकेला जोरदार विरोध दर्शविला आहे.
जळगावात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प
केंद्र सरकारच्या 'हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर'च्या सक्ती विरोधात असलेल्या राज्यव्यापी आंदोलनात जळगाव शहरातील 150 तर जिल्हाभरातील 2 हजार सराफा दुकानदार सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सराफ बाजारातील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. सराफ व्यावसायिकांसह इतर संलग्न व्यवसायही आज बंद आहेत. सराफांच्या बंदमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला.
सराफ व्यावसायिकांना उभारी देण्याऐवजी चुकीच्या पद्धतीने वागत आहे केंद्र सरकार
केंद्र सरकारने सक्तीची केलेली 'हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर'ची प्रक्रिया ही जाचक आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना जळगाव शहर सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूपकुमार लुंकड म्हणाले की, सराफ व्यावसायिकांनी हॉलमार्किंग प्रक्रियेला कधीही विरोध केला नाही. मात्र, हॉलमार्किंग प्रक्रियेत आता एचयुआयडीचा समावेश केला आहे. एचयुआयडीच्या सक्तीमुळे सुवर्ण व्यावसायिकांकडे जितके अलंकार, सोने-चांदी आहे, त्याची स्वतंत्र नोंद ठेवावी लागणार आहे. त्यापेक्षा जास्त वस्तू, अलंकार सराफाकडे सापडल्यास संबंधित व्यावसायिकावर कारवाई केली जाऊ शकते, अशी भीती आहे. केंद्र सरकारने ही जाचक अट रद्द करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. या सक्तीमुळे सराफ व्यवसाय देशोधडीला लागेल. छोटे-मोठे व्यावसायिक आधीच अडचणीत आहेत. त्यांना उभारी देण्याऐवजी सरकार चुकीच्या पद्धतीने वागत आहे, असेही स्वरूपकुमार लुंकड यांनी सांगितले.