जळगाव- आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या दरात सातत्याने चढउतार सुरुच आहे. जळगावातील सराफ बाजारात शुक्रवारी चांदीच्या दरात थेट २ हजार रुपयांनी घसरण झाली. चांदी ६२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर स्थिरावली. गेल्या ८ महिन्यातील चांदीचे हे सर्वात कमी दर आहेत.
सोन्याच्याही दरात ५५० रुपयांची घसरण होऊन ते ४७ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले. दरम्यान, गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्याने सराफ बाजारात उलाढाल संथच आहे.
हेही वाचा-गणेशविसर्जनाच्या दिवशी शहर आणि परिसरातील सर्व दुकाने बंद राहणार - अजित पवार
२ आठवड्यांपूर्वी चांदीचे दर होते६६ हजारांच्या पुढे-
सध्या सराफ बाजार प्रचंड अस्थिर आहे. मागील २ आठवड्यांपूर्वी जळगाव सराफ बाजारात चांदीचेदर प्रति किलोला ६६ हजारांच्या पुढे होते. मात्र, त्यानंतर मागच्याच आठवड्यात चांदीचे दर १ हजार रुपयांनी घसरले होते. तेव्हा चांदीचे दर ६५ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आले होते. तेव्हा चांदी आठवडाभर त्याच दरावर स्थिर राहिली होती. १६ सप्टेंबर रोजी चांदीच्या दरात पुन्हा १ हजाराने घसरण होऊन ती ६४ हजार ५०० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आली होती. ही घसरण होऊन पुन्हा अवघ्या काही तासातच म्हणजे, आज चांदीच्या दरात २ हजार रुपयांची मोठी घसरण झाली. आज जळगावात चांदीचे दर ६२ हजार ५०० रुपये प्रति किलो असे नोंदवले गेले.