जळगाव -सध्या सर्वत्र नवरात्रोत्सव सुरू आहे. पुढील काळात दसरा, दिवाळी असे महत्त्वाचे सण क्रमाने येत आहेत. या काळात तुम्ही सोने व चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सणासुदीच्या काळात सोने व चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. दररोज सोने व चांदीच्या दरांमध्ये किमान 200 ते 300 रुपयांनी चढ-उतार सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या आर्थिक घडामोडींचा परिणाम सोने व चांदीच्या दरांवर होत असल्याने स्थानिक सराफ बाजारात ही स्थिती आहे. सराफ बाजारात आगामी काही दिवस हाच ट्रेंड कायम राहण्याची शक्यता असून, सोन्याचे दर एक ते दीड हजारांनी तर चांदीचे दरही दोन ते अडीच हजार रुपयांनी खाली येऊ शकतात, असा जाणकार सराफांचा अंदाज आहे.
हेही वाचा -सोन्याला पुन्हा झळाळी; जाणून घ्या वाढलेले दर
'हे' आहे सोने व चांदीतील घसरणीचे प्रमुख कारण
सणासुदीच्या काळात सोने व चांदीचे दर सातत्याने अस्थिर राहण्याला वेगवेगळ्या प्रकारची कारणे आहेत. याबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना जळगाव शहर सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूपकुमार लुंकड यांनी सांगितले, की फार पूर्वीपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा सोने व चांदीच्या दरांवर परिणाम होत असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील उलाढालींवरून आपल्याकडे सोने व चांदीचे दर निश्चित होतात. पूर्वी आठवड्याला सोने व चांदीचे दर बदलायचे. पण आता तसे होत नाही. शेअर बाजार, मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये होणारे व्यवहार, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सट्टा बाजारातील कल अशा कारणांमुळे दिवसाला अनेक वेळा सोने व चांदीचे दर कमी जास्त होत असतात. सध्या सोने व चांदीच्या दरांमध्ये सतत घसरण होत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने व चांदीला मागणी कमी झाली आहे. अमेरिकेने बॉण्डवरील व्याजदर वाढवल्याने गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा तिकडे वळवला आहे. अमेरिकन मार्केटमध्ये बॉण्डमध्ये जास्तीचे व्याज कमावण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणूकदारांनी सोने व चांदीच्या विक्रीचा मारा सुरू केला आहे. त्यामुळे आपल्याकडे सोने व चांदीत मंदी आली आहे. पुढचे काही दिवस तरी त्यात तेजीची शक्यता दिसून येत नाही, असेही स्वरूपकुमार लुंकड म्हणाले.
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्येही चुकताहेत अंदाज
स्वरूपकुमार लुंकड पुढे म्हणाले, की अलीकडच्या काळात मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये होणारे व्यवहारदेखील मंदावले आहेत. याठिकाणी नेमकी काय परिस्थिती राहील, हे सांगणे कठीण होऊन बसले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने व चांदी विक्रीचा ट्रेंड सुरू असल्याने मल्टी कमोडिटी एक्सचेंजमधील व्यवहारांबाबतचे अंदाज चुकत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने 43 हजार रुपयांपर्यंत खाली येईल, असे वाटत असतानाच सोने 45 ते 46 हजारांपर्यंत येते आणि पुन्हा 48 हजार रुपयांच्या घरात जाऊन पोहचते. एकूणच काय तर सध्या सोने व चांदीच्या दरांबाबत निश्चित अंदाज बांधणे कठीण आहे.
हेही वाचा -VIDEO : भर दिवसा सर्वांसमोर महिलांनी चक्क सोन्याच्या दुकानातून 1 कोटी 20 लाखांचे दागिने पळवले
स्थानिक पातळीवर खरेदीची सुवर्णसंधी
सोने व चांदीचे दर सध्या अस्थिर दिसत असले तरी त्यात घसरणीचा ट्रेंड अधिक असल्याचे पाहायला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोने व चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी गुंतवणूकदारांना स्थानिक पातळीवर चालून आलेली आहे. जळगाव सराफ बाजारात मंगळवारी सकाळी व्यवहारांना सुरुवात झाली, तेव्हा 24 कॅरेट सोन्याचे दर 48 हजार 200 रुपये (3 टक्के जीएसटीसह) प्रतितोळा तर चांदीचे दर 63 हजार 500 रुपये प्रतिकिलो असे नोंदवले गेले. काही तासातच सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली होती. चांदीचे दरही 3 टक्के जीएसटीसह 64 हजार 800 नोंदवले गेले. आंतरराष्ट्रीय पातळीवर काही दिवस हीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज असल्याने सोन्याचे दर एक ते दीड हजारांनी तर चांदीचे दरही दोन ते अडीच हजार रुपयांनी खाली येऊ शकतात, असेही सराफांचे म्हणणे आहे.
ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच दोन्ही धातूंमध्ये झाली होती मोठी घसरण
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच सोने व चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण नोंदविण्यात आली होती. 1 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात 350 ते 400 रुपयांची तर चांदीच्या दरात विक्रमी 1750 ते 1800 रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच, 2 ऑक्टोबरला सोन्याच्या दरात 550 ते 600 तर चांदीच्या दरात 1450 ते 1500 रुपयांची घसरण झाली होती. 6 ऑक्टोबरला मात्र सोने सुमारे 300 रुपयांनी तर चांदी 900 रुपयांनी वधारली होती. आता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झाल्यानंतर मंगळवारी दुपारनंतर जळगावात सोन्याच्या दरात 300 रुपयांची वाढ नोंदवली गेली.