जळगाव -गेल्या काही दिवसांपूर्वी 48 हजार रुपयांपर्यंत खाली आलेले सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. सोन्याचे दर सध्या प्रतितोळा 50 हजार रुपयांच्या उंबरठ्यावर आहेत. सुवर्णनगरी म्हणून देशभर लौकिक असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात गुरुवारी सोन्याचे दर 3 टक्के जीएसटीसह प्रतितोळा 49 हजार 800 रुपये इतके नोंदवले गेले. सराफ बाजारातील गेल्या 24 तासातील उलाढालीचा विचार केला तर सोन्याचे दर प्रतितोळा सुमारे 600 ते 700 रुपयांनी वधारले आहेत.
'ही' आहेत सोन्याच्या दर वाढीची कारणे -
सोन्याचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडींवर अवलंबून असतात. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलर वधारल्याने गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याच्या खरेदीकडे वाढवला आहे. त्यामुळे सोन्याला मागणी वाढली असून, दर वाढत आहेत. आगामी आठवडाभर हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असून, सोन्याचे दर आताही 50 हजार रुपयांचा टप्पा ओलांडतील, असा सराफ व्यावसायिकांचा अंदाज आहे.
दोन दिवसात 700 रुपयांची वाढ -
सोन्याच्या वाढत्या दरांबाबत बोलताना जळगाव सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूपकुमार लुंकड म्हणाले की, जळगाव सराफ बाजारात गुरुवारी 23 कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा 49 हजार 800 रुपये (3 टक्के जीएसटीसह) इतके आहेत. सोन्याच्या दरात गेल्या दोन दिवसात सुमारे 600 ते 700 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांचा विचार केला तर सोन्याच्या दरांमध्ये सुमारे दीड ते दोन हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. बुधवारी (14 जुलै) जळगावात सोन्याचे दर हे 49 हजार 500 रुपये होते. गुरुवारी सराफ बाजार उघडताच त्यात पुन्हा 300 ते 325 रुपयांची वाढ झाल्याने हेच दर 49 हजार 800 रुपयांच्या घरात गेले, असे लुंकड यांनी सांगितले.