महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोन्याला झळाळी...जळगावात सोने ५३ हजारांवर; तर चांदी ६७ हजार रुपये किलो

जागतिक पातळीवर वाढलेली मागणी, आंतरराष्ट्रीय बाजारात सक्रिय झालेले दलाल तसेच अमेरिकन डॉलरचे वाढलेले दर यामुळे सोने-चांदीच्या भावामध्ये मोठी वाढ झाली आहे. या भाववाढीने सोन्याला नवी झळाली मिळत असून, मंगळवारी जळगावात सोने थेट ५३ हजार ७०० रुपये प्रतितोळा तर चांदी ६७ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहचली होती.

jalgaon saraf market
सोन्याला झळाळी...जळगावात सोने ५३ हजारांवर; तर चांदी ६७ हजार रुपये किलो

By

Published : Jul 29, 2020, 7:52 AM IST

जळगाव - जागतिक पातळीवर वाढलेली मागणी, आंतरराष्ट्रीय बाजारात सक्रिय झालेले दलाल तसेच अमेरिकन डॉलरचे वाढलेले दर यामुळे सोने-चांदीच्या भावामध्ये मोठी वाढ झाली आहे. या भाववाढीने सोन्याला नवी झळाली मिळत असून, मंगळवारी जळगावात सोने थेट ५३ हजार ७०० रुपये प्रतितोळा तर चांदी ६७ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहचली होती. आठवडाभरात सोन्याच्या भावात अडीच हजार रुपये प्रतितोळा तर चांदीमध्ये ७ हजार रुपये प्रतिकिलोने वाढ झाली आहे. जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीचे आतापर्यंतचे हे सर्वोच्च भाव आहेत.

कोरोनाच्या संकटात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदी खरेदीकडे कल वाढला आहे. या मौल्यवान धातूंची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्याने सोने-चांदीचे भाव वधारतच आहे. वाढती गुंतवणूक पाहता दलालांकडूनही मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी वाढली आहे. यात भर म्हणजे भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे दर वाढून ते ७९.७० रुपयांवर पोहचले आहे. या सर्व कारणांमुळे सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. सोने-चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत असल्याने नवनवे विक्रम गाठले जात आहे. सोन्याने ५० हजारांचा पल्ला ओलांडल्यानंतर आता ते थेट ५३ हजार ७०० रुपयांवर पोहचल्याने आतापर्यंतची ही सर्वात मोठी दरवाढ आहे. या सोबतच चांदीमध्येही अशाच प्रकारे आतापर्यंत सर्वात जास्त वाढ होऊन चांदीदेखील ६७ हजार रुपयांवर पोहचली आहे. चांदीतदेखील ७ हजार रुपयांची सर्वात मोठी वाढ ठरली आहे.

गेल्या आठवड्यात २१ जुलै रोजी सोने एक हजार रुपयांनी वधारून ते ५१ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते. आता तर यात थेट अडीच हजार रुपये प्रतितोळ्याने वाढ झाली आहे. तत्पूर्वी सुवर्णनगरी जळगावात ७ जुलैच्या लॉकडाऊनपूर्वी सोने ४९ हजार २०० वर होते. त्यानंतर सुवर्णपेढ्या सुरू होताच सोन्याचे भाव ८०० रुपयांनी वाढून ते ५० हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहचले होते. त्यानंतर २१ जुलै रोजी पुन्हा एक हजाराने वाढ झाली होती. आता अडीच हजार रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीमध्ये देखील अशाच प्रकारे वाढ झाली आहे. ७ जुलैच्या लॉकडाऊनपूर्वी चांदी ५० हजार ५०० वर होती. त्यानंतर १४ जुलै रोजी सुवर्णपेढ्या सुरू होताच चांदीच्या भावात ३ हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ५४ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहचली होती. त्यात आणखी ६ हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती ६० हजारांच्याही पुढे गेली व ६० हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहचली होती. आता तर थेट ७ हजार रुपये प्रतिकिलोने वाढ होऊन ती ६७ हजार रुपयांवर पोहचली आहे.

डिसेंबरपर्यंत चांदी ८० हजार तर सोने ६० हजारावर जाणार

जागतिक पातळीवरील स्थिती पाहता भविष्यात सोने-चांदीत गुंतवणूक वाढणार असल्याने या मौल्यवान धातूंचे भाव वाढतच राहणार असल्याचे सुवर्ण व्यावसायिक तथा जळगाव शहर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अजयकुमार ललवाणी यांनी 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. यामध्ये डिसेंबरपर्यंत चांदीचे भाव ८० हजार रुपये प्रतिकिलो तर सोने ६० हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहचण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जागतिक पातळीवर मागणीच्या प्रमाणात पुरवठा नसल्याने तसेच गुंतवणूक वाढतच असल्याने सोने-चांदीचे भाव वाढत आहेत. त्यात आता डॉलरचे दरही वधारले आहेत. त्यामुळे भाववाढीमध्ये भर पडत आहे. सध्याची स्थिती पाहता भविष्यात भाववाढ कायम राहणार असल्याचा अंदाज आहे, असेही अजयकुमार ललवाणी यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details