महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोने पुन्हा चकाकले; 'सुवर्णनगरी' जळगावात 52 हजार 500 रुपये प्रतितोळा - सोने दर बातमी

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर सातत्याने कमी जास्त होत आहेत. अशा परिस्थितीत सराफ बाजारातील उलाढालीवर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

gold rate hike
सोने पुन्हा चकाकले

By

Published : Jul 22, 2020, 4:57 PM IST

जळगाव- आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाजारात घडणाऱ्या घडामोडींमुळे सोने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा वधारले आहेत. जळगावात बुधवारी सराफ बाजार सुरू झाल्यानंतर सोन्याचे दर 52 हजार 500 रुपये प्रतितोळा तर, चांदीचे दर हे 63 हजार रुपये प्रतिकिलो असे होते. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर सातत्याने कमी जास्त होत आहेत. अशा परिस्थितीत सराफ बाजारातील उलाढालीवर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा -'काय भौ...खर्रा खाऊन रस्त्यावर थुंकतो अन् कोरोना पसरवतो'

सध्या कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा थेट परिणाम होत आहे. अशा प्रकारच्या परिस्थितीत भारतासह अमेरिका, रशिया, चीन अशा देशातील बडे गुंतवणूकदार कोणत्याही प्रकारची जोखीम नको म्हणून 'एक्सचेंज ट्रेडेड फंड' (इटीएफ) मध्ये मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी खरेदी करत आहेत. त्यामुळे आपल्याकडे सोने आणि चांदीचे दर या आठवड्याच्या सुरुवातीपासून वाढत आहेत. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहता गुंतवणूकदार गुंतवणुकीतील सुरक्षितता आणि योग्य परतावा या दोन बाबींचा विचार करून सोने आणि चांदी खरेदीला प्राधान्य देत आहेत. हीच परिस्थिती कायम राहिली तर याच आठवड्याच्या अखेरपर्यंत सोन्याचे दर प्रतितोळा 55 ते 58 हजार रुपयांपर्यंत तसेच चांदीचे दर प्रतिकिलो 65 ते 70 हजार रुपये होऊ शकतात, असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तवला आहे.

सोने पुन्हा चकाकले

आठवडाभरापासून दरवाढ सुरूच

गेल्या आठवडाभरापासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरूच आहे. आठवडाभरापूर्वी जळगावात सोन्याचे दर 50 ते 51 हजार रुपये प्रतितोळा तर चांदीचे दर 55 ते 56 हजार रुपये प्रतिकिलो असे होते. आता बुधवारी जळगावात सराफ बाजारात सोन्याचे दर 52 हजार 500 रुपये प्रतितोळा तर चांदीचे दर हे 63 हजार रुपये प्रतिकिलो असे आहेत. या दरांमध्ये जीएसटी समाविष्ट असल्याची माहिती जळगाव शहर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अजय ललवाणी यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना दिली.

सराफ बाजारावर मंदीचे सावट

सोने आणि चांदीचे दर सतत कमी जास्त होत असल्याने सराफ बाजारातील आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे. यावर्षी कोरोनामुळे संपूर्ण लग्नसराईचा कालावधी वाया गेला. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या अस्थिरतेमुळे सोने आणि चांदीचे दर सतत कमी जास्त होत आहेत. अशा परिस्थितीमुळे ग्राहक सोने-चांदी खरेदी करण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत. ही परिस्थिती कधी सुरळीत होईल, हे अनिश्चित आहे. त्यामुळे सराफ बाजारावर मंदीचे सावट आहे. दिवाळी आणि दसरा सण आल्यानंतर सराफ बाजारात परिस्थिती सुधारेल, असा विश्वास सराफ व्यावसायिकांना आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details