जळगाव- गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचे परिणाम अजूनही दिसत आहेत. गुरुवारी जळगावातील सुवर्ण बाजारात सोने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा घसरले. सोने 100 रुपयांनी तर चांदीचे दर तब्बल अडीच हजाराने कमी झाले आहेत.
सोन्याची बाजारपेठ गुरुवारी सकाळी सुरू झाल्यानंतर सोन्याचे दर जीएसटीसह 51 हजार 200 रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे दर जीएसटीसह 59 हजार 500 रुपये प्रति किलो असे होते. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी खरेदी करत आहेत. त्यामुळे आपल्याकडे सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत.
जळगावात चांदीसह सोने पुन्हा घसरले आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा सोन्यासह चांदीच्या किमतीवर परिणाम-
सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहता गुंतवणूकदार गुंतवणुकीतील सुरक्षितता आणि योग्य परतावा या दोन बाबींचा विचार करतात. त्यानंतर सोने आणि चांदी खरेदी व विक्रीला प्राधान्य देत आहेत. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी खरेदी-विक्रीवर सट्टा लावला जात आहे. त्यामुळे मौल्यवान धातूंचे दर अस्थिर झाले आहेत. दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय बाजाराचा कल बदलत आहे. त्यामुळे सोने व चांदीचे दर अस्थिर आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदारांनी सोने व चांदी विक्रीला पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशातील बाजारपेठेत सोने व चांदीचे दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सोने-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण नोंदविली जात आहे.
ग्राहकांमध्ये संभ्रम-
जळगाव शहर सराफ बाजार असोसिएशनचे सचिव स्वरूप लुंकड म्हणाले, की आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या खूप अस्थिरता आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सोने-चांदीची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे सोने-चांदीचे दर घसरत आहेत. यापुढे नेमकी काय परिस्थिती राहील, हे अनिश्चितच आहे. मात्र, सोने अजून 3 ते 4 हजार रुपयांनी घसरण्याची शक्यता आहे. चांदीचे दरदेखील अजून खाली येऊ शकतात. सध्या सोने व चांदीचे दर सतत बदलत आहेत. त्यामुळे ग्राहक संभ्रमात आहेत. या साऱ्या गोष्टीमुळे सुवर्ण बाजाराच्या उलाढालीवर परिणाम झाल्याचे लुंकड यांनी सांगितले.