जळगाव -'सुवर्णनगरी' म्हणून देशभर लौकिक असलेल्या जळगावच्या सराफ बाजारावर पुन्हा एकदा मंदीचे सावट निर्माण झाले आहे. सराफ बाजारात कधीकाळी दिवसाला कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असे. मात्र, कोरोना महामारी आली. त्यानंतर संपूर्ण व्यवहार ठप्प झाले. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू ओसरू लागला आणि सराफ बाजारातील व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणे सक्तीचे केले. त्यामुळे बाहेरील व्यापारी तसेच ग्राहक सोने खरेदीसाठी येत नसल्याने सुवर्णनगरीत उलाढाल थांबली आहे. याठिकाणची कोट्यवधी रुपयांची उलाढाल आता काही हजारांवर आली आहे. अशा परिस्थितीत सराफ व्यावसायिकांसह सराफ व्यवसायावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
जळगाव जिल्हा सोन्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. सचोटीमुळे येथील सराफ बाजारात देशभरातील व्यापारी आणि ग्राहक सोने खरेदीसाठी येत असतात. पूर्वपार ही परंपरा चालत आली आहे. मात्र, अलीकडच्या काळात सुवर्णनगरीतील सराफ व्यवसाय धोक्यात आला आहे. कोरोना महामारी आल्यानंतर टाळेबंदी लागली. त्यामुळे सराफ व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. तब्बल दीड ते पावणे दोन वर्षांचा काळ हा संक्रमणासारखा म्हणून गेला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस या नवीन व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा राज्य सरकारने कडक निर्बंध घातले. त्यातच केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणे सक्तीचे केल्याने सराफ व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.
जिल्ह्यात आहेत दीड हजारांवर सराफ व्यावसायिक -
जळगाव जिल्ह्यात लहान-मोठे मिळून सुमारे दीड हजारांवर सराफ व्यावसायिक आहेत. त्यात सर्वाधिक व्यावसायिक हे एकट्या जळगाव शहरात आहेत. कोरोनामुळे सराफ व्यवसायाचे अर्थचक्र पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे हे सर्वच व्यावसायिक सध्या अडचणीत आले आहेत. कोरोना काळात टाळेबंदीमुळे सराफ व्यावसायिकांची दुकाने दीर्घकाळ बंद होती. अशा परिस्थितीत लग्नसराई, सणासुदीचे मुहूर्त हुकले. कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांच्या ऑर्डर रद्द झाल्याने सराफांना फटका सहन करावा लागला. या परिस्थितीतून बाहेर पडत नाही तोच केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणे बंधनकारक केले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सराफ व्यावसायिक अजून अडचणीत आले. सध्या जिल्ह्यातील बहुसंख्य सराफ व्यावसायिकांनी शासनमान्य हॉलमार्किंग सेंटरकडे नोंदणी केलेली नसल्याने व्यवहार थांबले आहेत. अजून काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहिली तर परिस्थिती आणखी चिंताजनक होईल, अशी भीती सराफ व्यावसायिकांना आहे.
काय म्हणतात सराफ व्यावसायिक?
सराफ व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणींबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गौतमचंद लुणिया म्हणाले की, सोन्या व चांदीच्या व्यापारासाठी जळगाव जिल्हा सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र, ही ओळख आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कारण कोरोना, टाळेबंदी आणि त्यानंतर केंद्र सरकारने आणलेली हॉलमार्किंग सक्ती या बाबींमुळे सराफ व्यवसायाला फार मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे टाळेबंदी असताना सराफ बाजार अनेक महिने बंद होता. त्याकाळात एक रुपयांचीही उलाढाल झाली नव्हती. पण सराफांना दैनंदिन खर्च, मजूर व कारागिरांची देणी, कर असे खर्च चुकले नाही. अनलॉकनंतर व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच आता केंद्र सरकारने 'ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ॲक्ट- 2016' अंतर्गत 'हॉलमार्किंग ऑफ गोल्ड ज्वेलरी अँड गोल्ड आर्टिफॅक्टस् ऑर्डर- 2020' लागू करून सोन्याच्या दागिन्यांसह इतर सर्व वस्तूंवर हॉलमार्किंग करणे आणि ज्वेलर्सनी हॉलमार्किंग सेंटरमध्ये स्वतःची नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. काही अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने हॉलमार्किंगसाठी 1 सप्टेंबर 2021पर्यंत काही शिथिलता प्रदान केली आहे. मात्र, सराफ व्यावसायिकांची यातून सुटका नाहीच. अशा जाचक नियमावलीमुळे सराफ व्यवसाय धोक्यात येण्याची भीती असल्याचे लुणिया यांनी सांगितले.
हेही वाचा -मराठमोळी तरुणी अमेरिकेत झाली अब्जाधिश... कॉन्फ्लुएंट कंपनीतून उभे केले 828 दशलक्ष डॉलर