जळगाव- मोदी 2 सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात सोन्यासह मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव मांडल्याने सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. अर्थसंकल्प सादर होताच जळगावात सोन्याचे दर साडेपाचशे रुपयांनी वाढले. एका दिवसात सोन्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात दरवाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जळगावात शुक्रवारी सकाळी सराफ बाजार सुरू झाला तेव्हा सोन्याचे दर 34 हजार 200 रुपये प्रतितोळा होते. मात्र, अर्थसंकल्प सादर होताच सोन्याचे दर दुपारी साडेपाचशे रुपयांनी वाढून 34 हजार 750 रुपये प्रतितोळा एवढे झाले. वित्तीय तूट वाढत असताना सोने आयातीमुळे अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण होतो. त्यामुळे सोन्यासह मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थसंकल्पात मांडण्यात आला. हे आयात शुल्क सध्या 10 टक्के असताना ते अडीच टक्क्यांनी वाढून साडेबारा टक्के करण्याचा प्रस्ताव मांडल्यामुळे सोने महागले आहे.