जळगाव -जिल्ह्यातील पारोळा येथे घडलेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून दोषी आरोपींना कठोर शासन करावे, या मागण्यांसाठी आज (बुधवारी) दुपारी सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक संघटना तसेच पीडितेच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन निवेदन दिले. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, पीडितेवर अत्याचार करणाऱ्या तिघांसह त्यांना मदत करणाऱ्या महिलेला फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
काय आहे प्रकरण?
जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील टोळी येथील एका २० वर्षीय तरुणीचे अपहरण करत तीन नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. त्यानंतर बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत अत्यवस्थ झालेल्या पीडित तरुणीचा धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र संतप्त पडसाद उमटत आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी पीडितेचे कुटुंबीय जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला आलेले होते. यावेळी सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या प्रकरणाचा तपास पोलीस योग्यरीतीने करत आहेत. तीन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना दिले.