जळगाव - गिरणा नदीवर असलेले गिरणा धरण बुधवारी सायंकाळी 100 टक्के भरले. या वर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस पडला. गिरणा धरणाची निर्मिती झाल्यापासून धरण गेल्या 50 वर्षात दहाव्यांदा पूर्ण क्षमतेने भरले आहे. सद्यस्थितीत धरणात 21 हजार 500 दशलक्ष घनफूट एवढा जलसाठा आहे. दरम्यान, धरण 100 टक्के भरल्याने खबरदारी म्हणून गुरुवारी सकाळी 11 वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात आला.
दिलासादायक... गिरणा धरण 100 टक्के भरले'; 1238 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू - गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग
जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरण 100 टक्के भरले असून एका दरवाज्यातून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. पाटबंधारे विभागाने नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन नागरिकांना केले आहे.
गिरणा धरण 100 टक्के भरल्याने जळगावसह नाशिक जिल्ह्यातील शेकडो गावांचा पिण्याच्या पाण्याचा तसेच शेती सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक सुरूच असल्याने गुरुवारी सकाळी गिरणा नदीपात्रात 1238 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. गेल्या चार दिवसांपासून गिरणा धरण नव्वदीच्या पुढे आल्याने पाटबंधारे विभाग सतर्क होता. मंगळवारी रात्री व बुधवारी दिवसभरात गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली होती. त्यामुळे धरण बुधवारी सायंकाळी 100 टक्के भरले होते. सद्यस्थितीत धरणात 21 हजार 500 दशलक्ष घनफूट एवढा जलसाठा आहे. त्यातही सातत्याने भर पडत आहे. गिरणा धरणाला 14 दरवाजे असून पाणी नदीत सोडण्यासाठी ते आवश्यकतेनुसार उघडण्यात येतात.
गिरणा धरण 100 टक्के भरल्याने धरणाचा एक दरवाजा एका फुटाने उघडण्यात आला असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात वरील भागातून पाण्याची आवक सातत्याने वाढत असल्याने यापुढे गिरणा नदीपात्रात पात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येईल. त्यामुळे नदीकाठावरील गावातील ग्रामस्थांनी आपली गुरे नदीपात्रात घेऊन जाऊ नये, तसेच स्वतः ही नदीकाठी जाणे टाळावे, असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा-देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर