जळगाव- विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन एका आठवड्यापेक्षाही जास्त काळ झाला आहे. परंतु, भाजप आणि सेनेत सत्ता स्थापन करण्याच्या विषयावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सत्ता स्थापनेचा तिढा येत्या 9 तारखेपर्यंत निश्चित सुटेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगावात व्यक्त केला.
अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आयोजित दौऱ्यात पत्रकारांनी गिरीश महाजन यांना सत्ता स्थापनेच्या विषयावर प्रश्न विचारले असता ते बोलत होते.
महाजन पुढे म्हणाले, की सत्ता स्थापन करण्यासाठी 9 तारखेपर्यंत मुदत आहे. तोपर्यंत हा तिढा निश्चितच सुटेल, असे त्यांनी सांगितले. सत्ता स्थापनेचा विषय आता दिल्लीत नाही तर महाराष्ट्रातच होईल, असे वक्तव्य करणारे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना देखील महाजन यांनी यावेळी टोला लगावला. सत्ता स्थापनेच्या विषयावर शिवसेनेकडून फक्त संजय राऊत एकटे बोलत आहेत. माध्यमांसमोर तेच दिवसभर प्रतिक्रिया देत असल्याचे महाजन म्हणाले.