महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव: आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये रंगला राजकीय कलगीतुरा

पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यात राजकीय विषयांवरून चांगलाच कलगीतुरा रंगला. जळगाव महापालिकेच्या वतीने शनिवारी दुपारी आयोजित केलेल्या केंद्र सरकारच्या अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाऊसच्या लोकार्पण सोहळ्यात हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर होते.

Girish Mahajan, Gulabrao Patil on the same stage
गिरीश महाजन, गुलाबराव पाटील एकाच व्यासपीठावर

By

Published : Feb 20, 2021, 6:33 PM IST

जळगाव -जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यात राजकीय विषयांवरून चांगलाच कलगीतुरा रंगला. महापालिकेच्या वतीने शनिवारी दुपारी आयोजित केलेल्या केंद्र सरकारच्या अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाऊसच्या लोकार्पण सोहळ्यात हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर होते. यावेळी दोघांनी आपल्या भाषणात एकमेकांना राजकीय चिमटे घेण्याची संधी सोडली नाही.

या कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे, लता सोनवणे, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे आदींसह नगरसेवक उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने सुप्रिम कॉलनीतील गजानन महाराज मंदिराजवळ उभारण्यात आलेली अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाऊसचे यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

काय म्हणाले गिरीश महाजन?

आपल्या भाषणात गिरीश महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जोरदार चिमटे घेतले. ते म्हणाले, आज सुप्रिम कॉलनीत अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाऊसचे लोकार्पण होत आहे. या परिसरात शिवसेनेचे अवघे तीन नगरसेवक आहेत. महापालिकेत आमचे संख्याबळ जास्त आहे. पण आम्ही दुजाभाव केला नाही. हे राज्यात आदर्श ठरणारे उदाहरण आहे. पण राज्यात असे घडले नाही. आमच्या मतदारसंघाचे पैसे तुम्ही पळवले. सत्ता आपली आहे, काल तुमची सत्ता होती. उद्या आमची सत्ता असेल, काही सांगता येत नाही. उद्या-परवा आपली सत्ता असेल. आज तर मला याठिकाणी युतीची सत्ता आहे, असेच वाटतेय. भविष्यात काय घडेल, हे सांगता येत नसल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

महाजनांना गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

गिरीश महाजन यांच्यानंतर भाषणाला आलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार कोटी केली. गुलाबराव पाटील म्हणाले, आज सत्ता आहे, पण उद्या कोणाची सत्ता येईल, हे सांगता येत नाही. गिरीश महाजन यांनी महापालिकेत कशी सत्ता आणली, हे मला चांगले माहिती आहे. त्यांनी जी रसद पुरवून सत्ता आणली ती रसद आमच्याकडे नव्हती. त्यांनी राज्यात जे केले, तेच महापालिकेतही केले. तेव्हा जर तुम्ही आमच्याशी 'लव्ह मॅरेज' केले असते, राज्यात सरकार स्थापनेवेळी एक पाऊल पुढे टाकले असते तर आज राज्यात युतीचीच सत्ता राहिली असती. पण ते आपल्या हातात नाही. वरचे लोक काय करतात, कार्यकर्ता म्हणून जो रोल आपल्याला दिला जातो, तो आपल्याला करावा लागतो, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

गिरीश महाजन, गुलाबराव पाटील एकाच व्यासपीठावर

विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन

या सोहळ्यात दोन्ही नेत्यांनी शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचे एकमेकांना आवाहन केले. महापालिका प्रशासनाला विविध विकासकामांसाठी राज्य शासनाकडून मिळालेल्या निधीच्या मुद्द्यावरून देखील दोन्ही नेत्यांनी एकोंएकांना चिमटे घेतले. त्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details