जळगाव -राज्यात कोरोना आहे. पण, आमच्या जिल्ह्यात जरा वेगळ्या प्रकारचा कोरोना आहे. एका व्यक्तीला तीन-तीन वेळा त्याची लागण होत आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना गेल्या दोन महिन्यात तीनवेळा कोरोनाची लागण झाली आहे. हा कोणत्या प्रकारचा कोरोना आहे, याची चौकशी करावी, असे मी म्हणणार नाही. पण, या कोरोनावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले पाहिजे, अशी मागणी करत भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंना झालेल्या कोरोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
केंद्र सरकारच्या अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाऊसचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि. 20 फेब्रुवारी) दुपारी जळगावात पार पडला. या सोहळ्याला भाजप नेते गिरीश महाजन उपस्थित होते. या सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात असलेले हाडवैर जगजाहीर आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते संधी मिळेल तेव्हा एकमेकांना चिमटे काढत असतात. अशाच प्रकारे महाजन यांनी चिमटा घेतल्याचे बोलले जात आहे.