जळगाव - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर राजकीय चर्चांना उधान आले होते. यासंदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या वतीने प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आणि सेनेत युती असून युतीच्या पक्ष श्रेष्ठींमध्ये जे ठरेल तेच होईल, अशी भूमिका गिरीश महाजन यांनी मांडली आहे.
गिरीश महाजनांची प्रतिक्रिया युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील, हे शिवसेनेचे म्हणणे आहे. ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. ते तसे म्हणू शकतात, आम्ही त्यावर हरकत घेण्याचे कारण नाही. मात्र, भाजप आणि सेनेची युती असून युतीत जे ठरेल तेच होईल, असेही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसात-
मंत्रिमंडळाचा शुक्रवारी होणारा विस्तार बारगळला असल्याची भाजपच्या वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळत आहे. तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक समजले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता व्यक्त करत आहेत. येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार शक्य असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा सर्वस्वी अधिकार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असून आपण या विषयासंदर्भात अधिक बोलणार नाही, असेही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.
भाजपच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना विस्ताराची तारीख निश्चित होत नसल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजपच्या वरिष्ठ सूत्रांकडून मंत्रिमंडळ विस्तार बारगळल्याची माहिती असताना गिरीश महाजन यांनी मात्र, वेगळीच भूमिका मांडल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.