जळगाव - आज कोणीही राजकारणी व्यक्ती महापुरुषांवर टीका-टिप्पणी करत आहेत. आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी असे प्रकार केले जात आहेत. हे अतिशय चुकीचे असून, केंद्र तसेच राज्य सरकारने याबाबतीत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. असे प्रकार रोखण्यासाठी कायदा कडक व्हायला हवा, असे मत भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज (सोमवार) जळगावात व्यक्त केले.
जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक प्रदीर्घ काळानंतर आज (सोमवारी) दुपारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आज कोणीही महापुरुषांबद्दल टीका-टिपण्णी करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, आतातर आपण साईबाबांच्या बाबतीत देखील हा प्रकार अनुभवतोय. केंद्र आणि राज्य सरकारने याबाबतीत कायदा करण्याची गरज आहे. सातत्याने असे प्रकार घडत असल्याने ही मंडळी लोकशाहीचा गैरफायदा घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या महापुरुषांबद्दल टीका होत आहे, ते राजकारणापलीकडे आहेत. मात्र, काही राजकीय मंडळी आपल्या स्वार्थासाठी हे उद्योग करत आहेत. हे कुठेतरी थांबायला हवे, अशी अपेक्षा गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.