जळगाव- पर्यावरणाचा समतोल राखण्यासह मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा असावी, या उद्देशाने शहरातील नेरीनाका स्मशानभूमीत अत्याधुनिक गॅस शवदाहिनी उभारण्यात आली आहे. या शवदाहिनीचे लोकार्पण रविवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहातून ऑनलाईन हा लोकार्पण सोहळा पार पडला. जळगावातील सेवाभावी संस्था केशवस्मृती संस्थेच्या वतीने ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जळगावात अत्याधुनिक गॅस शवदाहिनीचे लोकार्पण; केशवस्मृती प्रतिष्ठानचा पुढाकार - गॅस शवदाहिनीचे लोकार्पण
एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही झाडांची कत्तल करावी लागते. तसेच पावसाळ्यात लाकडांसाठी अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागतो. नेरीनाका स्मशानभूमीत दिवसभरात १० ते १२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असतात. या अत्याधुनिक शवदाहिनीमुळे झाडांची होणारी कत्तल थांबणार असून, पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यास मदत होणार आहे.
या सोहळ्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, केशवस्मृती संस्थेचे अध्यक्ष भरत अमळकर आदींची उपस्थिती होती.
केशवस्मृती प्रतिष्ठानचा पुढाकार-
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मृतांची संख्या देखील वाढत होती. जून महिन्यात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जळगाव जिल्ह्याच्या आलेले असताना त्यांनी शहरात मनपाच्यावतीने विद्युत दाहिनी बसविण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचना देवूनही मनपा प्रशासनाने फारसे लक्ष दिले नव्हते. त्यानंतर तत्कालीन स्थायी समिती सभापती ॲड. शुचिता हाडा यांनी केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सहकार्याने स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसविण्याचा प्रस्ताव दिला होता. केशवस्मृती प्रतिष्ठानने मनपाचा प्रस्ताव मान्य करत कामाला सुरुवात केली होती. फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या स्थायी समितीच्या सभेत केशवस्मृती प्रतिष्ठानने शहरात गॅस दाहिनी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला होता. या सभेत प्रस्तावाला मंजुरी देखील देण्यात आली होती. मात्र, मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यानंतर हा प्रस्ताव रखडला होता. दरम्यान, आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनंतर मनपाने केशवस्मृती प्रतिष्ठानच्या संचालकांशी चर्चा करत, आवश्यक मशिनरी उपलब्ध करून दिली.
शव दाहिनीचे वैशिष्ट्य-
- गॅस दाहिनीसाठी अंदाजे ५० लाखांपर्यंतचा खर्च लागला आहे.
- एका मृतदेहावर ४५ मिनिटात अंत्यसंस्कार होणार आहेत.
- शवदाहिनी पूर्णपणे एल.पी.जी.गॅसवर कार्यान्वित राहणार.
- एका मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर २ तासांनी अस्थी उपलब्ध होणार.
- एका दिवसात ८ ते १० मृतदेहांवर होवू शकतात अंत्यसंस्कार.
- मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी १५०० रुपयांचे शुल्क संस्थेकडून आकारले जाणार आहे.
- शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी मिळून स्थापन झालेल्या स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून शवदाहिनीचे चालणार काम.
- बडोदा येथील विश्वकर्मा कंपनीने तयार केली शवदाहिनी.