जळगाव - गेल्या ७५ दिवसांपासून संपूर्ण गोलाणी मार्केट पूर्णत: बंद आहे. मात्र, या मार्केटमध्ये अनेक दिवसांपासून साफसफाई झालेली नसल्याने मार्केटमधील अनेक विंगमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. स्वच्छतागृहांत व बाहेर, दुकानांचे पॅसेज, जिन्याच्या पायऱ्या व लिफ्टच्या बाहेर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. तसेच कचरा कुंड्यादेखील ओसंडून वाहत असल्याने मार्केटमध्ये दुर्गंधी पसरलेली असते.
गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल दुकानांसह अनेक प्रकारच्या व्यावसायिकांची दुकाने आहेत. लॉकडाऊनमुळे गेल्या ७५ दिवसांपासून ही दुकाने बंद आहेत. मात्र, या मार्केटमध्ये महापालिकेचे स्वच्छतेबाबत प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. या मार्केटमध्ये पावलोपावली कचरा साचलेला दिसत आहे. लिफ्ट, स्वच्छतागृहे, जिना, दुकानांचे पॅसेज, कचरा कुंड्या आदी ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचलेले दिसत आहेत.