जळगाव - पाच ते सहा जणांच्या टोळक्याने पूर्ववैमनस्यातून एका दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना जळगावमध्ये घडली. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मेहरुण परिसरातील एकनाथ नगर परिसरात ही घटना घडली. अंबादास सुखदेव वंजारी (वय ४५) आणि सुनीता अंबादास वंजारी (वय ४०) अशी या हल्ल्यात जखमी झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत.
हे ही वाचा -बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी उत्तरप्रदेशातील दोघांना अटक, नवी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
अंबादास वंजारी हे रिक्षाचालक असून त्यांचा १० वर्षांपूर्वी प्रशांत कोळी नावाच्या तरुणाशी वाद झाला होता. त्याचा राग डोक्यात ठेवून रविवारी दुपारी प्रशांतने त्याच्या चार ते पाच साथीदारांसह वंजारी दाम्पत्याला मारहाण केली. मारहाण करणारे तरुण रिक्षातून आले होते. त्यांनी सुरुवातीला सुनीता वंजारी यांना मारहाण केली. प्रशांत कोळी याने ओट्यावर बसलेल्या सुनीता यांच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. यानंतर घरात घुसून त्यांची गर्भवती सून सोनू राहुल वंजारी हिला देखील धक्का देऊन जमिनीवर फेकले. हा प्रकार पाहून अंबादास वंजारी त्याठिकाणी धावले असता टोळक्याने त्यांच्याही डोक्यात बियरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. टोळक्याने वंजारी दाम्पत्याला लाठ्या-काठ्या व फायटरने मारहाण करून जखमी केले. सुनीता यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी ओढून घेत टोळक्याने पळ काढला.