जळगाव :सर्वांसाठीआनंद आणि चैतन्याची पर्वणी घेऊन येणाऱ्या गणेशोत्सवाची सर्वत्र लगबग सुरू आहे. आज मोठ्या उत्साहात, जल्लोषात गणरायाचं आगमन होणार आहे. त्यामुळे गणेशमूर्तींची चर्चा ऐकायला मिळत आहे. आजवर आपण नारळ, वृत्तपत्र, सोने व चांदीपासून गणेशमूर्ती साकारल्याचे ऐकले असेल. पण कधी साबुदाण्यापासून गणेशमूर्ती बनवल्याचे ऐकले आहे का? नाही ना... हो, जळगावात एका बंगाली मूर्तिकाराने चक्क नायलॉन साबुदाण्यापासून 5 फुट आकर्षक गणेशमूर्ती साकारली आहे. सध्या ही मूर्ती चर्चेचा विषय ठरली आहे.
मूर्तीकाराचे नाव
रामकृष्ण साचूगोपाल पाल (वय 41) असे या मूर्तिकाराचे नाव आहे. रामकृष्ण पाल हे मूळचे पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील रहिवासी आहेत. मूर्ती साकारण्याचा त्यांचा पिढीजात व्यवसाय आहे. ते गेल्या 15 वर्षांपासून जळगावात विविध मूर्ती साकारण्याचे काम करत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे इतर 10 ते 12 कारागिर देखील मूर्ती साकारण्याचे काम करतात.
अशी सूचली गणेशमूर्ती साकारण्याची कल्पना
रामकृष्ण पाल हे दरवर्षी गणेशोत्सवासाठी वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित गणेशमूर्ती साकारतात. हेच वेगळेपण त्यांनी जपले आहे. यापूर्वी त्यांनी चहापत्ती, शेंगदाणे, काजू-बदाम, बिस्कीट, नारळ तसेच विविध फळांपासून गणेशमूर्ती साकारल्या आहेत. गेल्या वर्षी मध्य प्रदेशातील खेतिया येथील एका गणेश मंडळाने त्यांच्याकडून नारळाची गणेशमूर्ती विकत घेतली होती. यावर्षी याच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जरा हटके संकल्पनेवर गणेशमूर्ती साकारण्याची विनंती केली होती. त्यानुसार रामकृष्ण पाल यांनी नायलॉन साबुदाण्यापासून गणेशमूर्ती साकारली.
20 दिवसात मूर्ती पूर्ण