जळगाव -विद्येची देवता असलेल्या लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. मात्र, अशा परिस्थितीतही कोरोनामुळे जळगावातील बाजारपेठेत हवा तसा उत्साह नाहीये. कोरोनामुळे गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत नसल्याने उलाढाल ठप्प आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन यावर्षी महापालिका प्रशासनाने शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिवतीर्थ मैदानावर गणेशमूर्ती विक्रेत्यांना स्टॉल्स लावण्यास परवानगी दिली आहे. परंतु, संततधार पाऊस सुरू असल्याने त्याठिकाणी सर्वत्र चिखल झाला आहे. शिवाय विद्युत प्रकाश व्यवस्था नसल्याने विक्रेत्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यावर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील बाजारपेठेत उत्साह नाहीये. विविध रंगांच्या तसेच आकाराच्या आकर्षक गणेशमूर्ती, पूजेचे आणि सजावट साहित्य, मनोवेधक मखर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. परंतु, खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची पाहिजे तशी वर्दळ नाही. त्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल ठप्पच आहे. एरवी गणेशोत्सवाच्या आठवडाभर आधीच जळगावातील बाजारपेठेत उत्साह पाहायला मिळतो. यावर्षी कोरोनामुळे परिस्थिती अगदी उलट आहे. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असला तरी बाजारपेठेत कमालीची शांतता असल्याचे दिसून येत आहे.
बाजारपेठेतील परिस्थिती संदर्भात 'ईटिव्ही भारत'शी बोलताना गणेशमूर्ती विक्रेते प्रसाद कासार म्हणाले की, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून आम्ही ग्राहकांच्या सोयीसाठी आठवडाभर आधीच गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल्स लावले. पण कोरोनामुळे ग्राहक घराबाहेर पडत नसल्याने आधीपासूनच हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आता तर गणेशोत्सव दोन दिवसांवर आला आहे. आगामी दोन दिवस देखील असाच प्रतिसाद असला तर मोठा फटका बसणार आहे. लाखो रुपयांचा माल आम्ही आणून ठेवला आहे. नफा तर सोडा टाकलेला खर्चही निघणार नाही. शिवाय मैदानावर स्टॉल लावण्याचे भाडे पण खिशातून महापालिकेकडे भरावे लागेल, असे प्रसाद कासार म्हणाले. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून गणेशमूर्ती विक्रेत्यांनी स्टॉल्स लावलेल्या शिवतीर्थ मैदानावर कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरवल्या नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संततधार पाऊस सुरू असल्याने याठिकाणी सर्वत्र चिखल झाला आहे. शिवाय प्रकाश व्यवस्था नसल्याने अडचणी आहेत.
गणेशमूर्ती विक्रेते माहिती देताना... ग्राहकच नसल्याने गणेशमूर्तींचा खप घसरला -गणेशमूर्तींच्या खपबाबत बोलताना विक्रेते अमोल कासार म्हणाले, यावर्षी गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊनही कोरोनामुळे गणेशमूर्ती खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह नाही. हँड सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंग अशा प्रकारची तजवीज करुनही नागरिकांचा गणेशमूर्ती खरेदीला प्रतिसाद नाही. जे मोजके नागरिक गणेशमूर्ती खरेदीसाठी येत आहेत, ते कोरोनामुळे समोर येऊन बोलण्यास घाबरतात. अशीच परिस्थिती आधीपासून आहे. त्यामुळे यावर्षी खप निम्म्याहून अधिक प्रमाणात घटेल, असा अंदाज अमोल कासार यांनी 'ईटिव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे लागले तयारीला -
जळगाव शहरात गणेशोत्सवाची तयारी सार्वजनिक मंडळांकडून सुरु आहे. अवघ्या दोन दिवसात लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांकडून 'श्रीं'च्या स्थापनेसाठी लगबग सुरू आहे. अनेक मंडळांचे मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शनिवारी विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन होत आहे. यावर्षी सर्वांसमोर कोरोनाचे आव्हान आहे. त्यामुळे चांगल्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा गणेशोत्सव सार्वजनिक मंडळे आरोग्य उत्सव म्हणून साजरा करणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, जसे की रक्तदान, प्लाझ्मादान विषयक जनजागृती, रुग्णांना मोफत सकस आहार पुरविणे, घरपोच आरोग्य तपासणी करण्याबरोबरच रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन उपलब्ध करुन देण्यावर यावर्षी मंडळांचा भर राहणार आहे.