जळगाव - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आज(बुधवार) देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. जळगावात देखील विविध संस्था, संघटनांच्या वतीने महात्मा गांधी यांची जयंती साजरी होत आहे. या दिनानिमित्ताने गांधी रिसर्च फाउंडेशनने अहिंसा, सद्भावना, शांती रॅली काढून महात्मा गांधींना अभिवादन केले.
शहरातील महापालिका इमारतीपासून अहिंसा रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत समाजाच्या सर्वच घटकातील मान्यवरांसह विविध शाळा, विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ही रॅली कोर्ट चौक, नवीन बसस्थानक मार्गाने गांधी उद्यानात आली. त्याठिकाणी अभिवादन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला गांधी रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष तथा अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, महापालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळे, संघपती दलीचंद जैन आदी मान्यवर उपस्थित होते.