जळगाव -जिल्हा कारागृहातून रक्षकाला बंदूकीचा धाक दाखवून २५ जुलैला तीन कैदी फरार झाले होते. यातील मुख्य सूत्रधार असलेला बडतर्फ पोलीस कर्मचारी सुशील मगरे हा पुन्हा पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पाच महिन्यांपासून फरार असलेल्या मगरेला पहूर पोलिसांनी शिताफीने पकडले. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यास अटक करण्यात आली.
दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये जळगाव जिल्हा कारागृहात असलेल्या सुशील अशोक मगरे या बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने कारागृहातील अन्य कैदी गौरव पाटील आणि सागर पाटील यांच्यासह २५ जुलैला पलायन केले होते. कारागृहातील रक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून ते आरोपी जगदीश पाटील याच्या मदतीने फरार झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने महिन्याभरानंतर यातील दोन आरोपींना अटक केली, ते कारागृहात आहेत. मात्र मुख्य सूत्रधार बडतर्फ पोलीस कर्मचारी सुशील अशोक मगरे (रा. पहूर, ता.जामनेर) पोलिसांना चकवा देत होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विविध पथक त्याच्या मागावर होते. अखेर रविवारी त्याला अटक करण्यात आली.