जळगावात पेट्रोल शंभरीपार; डिझेलही शतकाच्या उंबरठ्यावर - इंधन दरवाढ
इंधनाचे दर पुन्हा एकदा भडकले आहेत. जळगावात पेट्रोल 101.09 रुपये, तर डिझेल 91.58 रुपये प्रतिलिटर झाले आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. तर डिझेलचे दरही शंभराच्या दिशेने वाटचाल करत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे हे दर आतापर्यंतचे सर्वाधिक उच्चांकी दर आहेत.
जळगाव -इंधनाचे दर पुन्हा एकदा भडकले आहेत. जळगावात पेट्रोल 101.09 रुपये, तर डिझेल 91.58 रुपये प्रतिलिटर झाले आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. तर डिझेलचे दरही शंभराच्या दिशेने वाटचाल करत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे हे दर आतापर्यंतचे सर्वाधिक उच्चांकी दर आहेत. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.
जळगाव शहरात पेट्रोलचे दर गेल्या आठवड्यातच शंभरी पार झाले होते. जळगावात सध्या पेट्रोल 101 रुपये 09 पैसे प्रतिलिटर इतक्या उच्चांकी दराने विकले जात आहे. देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. त्याची झळ सर्वसामान्य जनतेला बसली आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
कर कमी करण्याची मागणी -
इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने महागाईत भर पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. आता तरी केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील करांचा बोजा कमी करावा आणि दरांवर नियंत्रण आणावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांप्रमाणेच वाहनांचे इंधन ही आजच्या घडीला जीवनावश्यक बाब झाली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन सरकारने काहीतरी उपाय योजना करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.