जळगाव -शहरात विविध फळविक्रेते कार्बाईड तसेच इतर रसायने लावून फळे पिकवत असल्याच्या तक्रारी महापालिका आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आज सकाळी शहरातील गोलाणी मार्केटमधील काही फळविक्रेत्यांकडे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करत फळांचे नमुने घेतले. या कारवाई दरम्यान काही फळ विक्रेत्यांनी पळ काढला. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाला नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर कारवाईचे शहाणपण सुचल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
जळगावात फळविक्रेत्यांकडे आरोग्य विभागाकडून तपासणी; फळांचे घेतले नमुने - jalgaon
जळगाव शहरात ठिकठिकाणी फळे विक्रेत्यांनी दुकाने, स्टॉल्स थाटले आहेत. सद्यस्थितीत आंबा, मोसंबी या फळांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. हीच संधी साधून अनेक फळविक्रेते आंबा तसेच मोसंबी कार्बाईड तसेच इतर रसायने लावून पिकवत आहेत.
जळगाव शहरात ठिकठिकाणी फळे विक्रेत्यांनी दुकाने, स्टॉल्स थाटले आहेत. सद्यस्थितीत आंबा, मोसंबी या फळांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. हीच संधी साधून अनेक फळविक्रेते आंबा तसेच मोसंबी कार्बाईड तसेच इतर रसायने लावून पिकवत आहेत. बाजार समिती, गोलाणी मार्केट, फुले मार्केट परिसरात हा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. याबाबत काही सुज्ञ नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन गोलाणी मार्केटमधील काही फळ विक्रेत्यांकडे तपासणी करण्यात आली. काही फळांचे नमुने घेण्यात आले. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर महापालिकेचा आरोग्य विभाग हलला आहे. गोलाणी मार्केटमधील मोजक्या फळविक्रेत्यांकडे तपासणी करण्यात आली. मात्र, यापुढेही अशी कारवाई सुरूच राहिली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.