जळगाव -चौघे मित्र सोबत दारु प्यायल्यानंतर त्यांच्यात किरकोळ वाद झाले. यातच एकाने दुसऱ्याच्या कानशिलात मारली. याच रागात थेट चाकूने वार करुन त्याने मित्रालाच संपवले. रविवारी रात्री १२ वाजता शिवाजीनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर हा थरार झाला. या गुन्ह्यात पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक केली आहे. भूषण भरत सोनवणे ऊर्फ अठ्ठा असे मृत तरुणाचे नाव आहे. अतुल ज्ञानेश्वर काटकर (वय २५, रा. शहुनगर), दुर्गेश आत्माराम सन्यास ऊर्फ पपई (वय २६, रा. गेंदालाल मिल) व प्रतीक निंबाळकर (वय २५, रा. शिवाजीनगर) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
भूषणस अतुल, दुर्गेश व प्रतीक हे चौघे एकमेकांचे पक्के मित्र आहेत. रविवारी रात्री चौघे सोबत दारु प्यायले. यांनतर किरकोळ वाद झाला व त्यातून भूषणने अतुलच्या कानशिलात लगावली. यामुळे अतुलचा राग अनावर झाला. त्याने कमरेत लपवलेला चाकू काढून थेट भूषणवर वार केले. प्रतीक व दुर्गेश यांनीही भूषणला मारहाण केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भूषणची आई तिरोना धावत आली असता तिला पाहून तिघांनी पळ काढला. यावेळी विवेक नंदलाल मुंदडा, प्रवीण देविदास पाटील व संगम देविदास भोई या तिघांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र ते सापडले नाहीत. शहर पोलिसांनी रात्री उशिरा प्रतीक व अतुल यांना याच परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली.
हेही वाचा -जळगावातील शिवाजी नगरात पुन्हा तरुणाचा खून; एक संशयित ताब्यात