जळगाव -कोरोनामुळे मृतांच्या संख्येत झालेली वाढ पाहाता, जळगाव शहराच्या स्मशानभूमीत गरजू व निराधारांना अंत्यविधीसाठी लाकडे कमी पडू नये, यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने, विद्यापीठ परिसरातील झाडांची जळाऊ लाकडे महापालिकेकडे मोफत सुपूर्द केली आहेत. ही लाकडे अंदाजे १५० ते २०० टन असण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या या उद्भवलेल्या स्थितीत स्मशानभूमीत लाकडे कमी पडू नयेत, यासाठी प्रभारी कुलगुरु प्रा. ई.वायुनंदन यांच्या पुढाकाराने विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने विद्यापीठ परिसरातील जळाऊ लाकडे महापालिकेकडे मोफत सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठाच्या ६५० एकरच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यातील कोसळलेली किंवा वाळलेली झाडे एकत्रित करुन ठेवली होती. त्यामध्ये लिंब, गुलमोहर, सुबाभूळ, निलगिरी तसेच काही काटेरी वृक्षांचा समावेश आहे. महापालिकेशी विद्यापीठाने पत्रव्यवहार केला व ही लाकडे मोफत देण्याची तयारी दर्शविली, महापालिकेनेही त्याला प्रतिसाद दिला. त्यानुसार महापालिकेच्या वाहनाने ही लाकडे उचलण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
विद्यापीठाचे मानले आभार