जळगाव -प्लॉस्टिकचे दाणे तयार करण्याच्या कंपनीत ५० टक्के भागीदारी देण्याच्या नावाखाली नवसारी (गुजरात) येथील शेतकऱ्याची जळगावातील तरुणाने ५ लाख ८५ हजार रुपयांत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अधिक माहिती अशी की, सुलेमान इस्माईल दिलेर (वय ४७, रा. जलालपुर, नवसारी) व जळगाव येथील जावेद सलिम पटेल (रा. शेरा चौक) यांची २०१४ मध्ये तडकेश्वर (सुरत) येथे ओळख झाली. पटेल याची सुरत येथील ऊनपाटीया येथे प्लॉस्टिक दाण्याची कंपनी होती. सुलेमान दिलेर यांचे शालक मौलाना अय्युब फकिर यांना घेवून जावेद पटेल हे दोघे डिसेंबर २०१४ मध्ये सुलेमान यांच्याकडे गेले. जळगावात एक फॅक्टरी सुरू करायची असून त्यात भागीदार राहु अशी बतावणी त्याने सुलेमान यांच्याकडे केली. त्यानुसार सुलेमान हे कंपनीची जागा पाहण्यासाठी ३ जानेवारी २०१५ रोजी जळगावला काही नातेवाईक व मित्रांसोबत आले. यावेळी पटेल याने एमआयडीसीतील एक बंद पडलेली कंपनी दाखवून आपण इथेच कंपनी सुरू करणार असल्याचे सांगितले.
त्यानुसार सुलेमान यांनी पटेलला ५ लाख रूपये दिले. याचा करारनामा लिहुन घेतला होता. पैसे देवून ते पुन्हा गुजरात ला निघून गेले. त्यानंतर काही महिन्यांनी नफ्याची रक्कम मागितली असता कंपनी तोट्यात असल्याचे जावेद पटेलने सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर २०१७ मध्ये जावेदने ९० हजार रूपये रोख परत केले. कंपनीत अजून चांगला नफा मिळविण्यासाठी पटेल याने आणखी दोन लाख रुपये घेतले. वारंवार पैश्यांचा तगादा लावला असता त्यांनी चार ते पाच वेळा बँकेत जवळपास २३ हजार ४१९ रूपये ट्रान्सफर केले. सुलेमान दिलेर यांनी दिलेल्या ७ लाख रुपयांपैकी केवळ १ लाख १३ हजार रूपये परत केले. उर्वरित रक्कम ५ लाख ८६ रूपयांची फसवणूक केली.
यामुळे सुलेमान यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पटेल याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर लागलीच पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, अतुल वंजारी, विजय पाटील, इम्रान सय्यद, संदीप धनगर यांच्या पथकाने पटेल याला अटक केली आहे. विजय पाटील तपास करीत आहेत