जळगाव -भरधाव वेगात जाणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील चौघे जागीच ठार झाले. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. हा अपघात आज (बुधवारी) दुपारी 12 वाजेच्या सुमारास चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर रोहिणी ते तळेगाव दरम्यान घडला.
जळगावात कार-दुचाकीच्या अपघातात चौघे ठार, एकाच कुटूंबातील तिघांचा समावेश अपघातात सुदैवाने 2 वर्षांचा मुलगा बचावला
या अपघातात कन्नड तालुक्यातील तांदुळवाडी येथील विलास वसंत मोरे (वय 40) त्यांची पत्नी कल्पना विलास मोरे (वय 36), मुलगी रेणुका विलास मोरे (वय 3) यांच्यासह भगवान नागराज पाटील (वय 36, रा. वाघडू, ता. चाळीसगाव) हे जागीच ठार झाले. या भीषण अपघातात सुदैवाने विलास मोरे यांचा 2 वर्षांचा मुलगा अमोल हा बचावला. मात्र, तो पण जखमी झाला असून, त्याला धुळ्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातात कारमधील 2 जण देखील जखमी झाले आहेत.
पत्नीला प्रसूतीसाठी गावी नेताना घडला अपघात -
विलास मोरे हे मूळचे कन्नड तालुक्यातील तांदुळवाडी येथील रहिवासी होते. ते वाघडू येथे सालदारकी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांची पत्नी कल्पना या गर्भवती होत्या. त्यांना प्रसूतीसाठी ते तांदुळवाडी येथे दुचाकीने सोडायला जात होते. मात्र, रस्त्यातच भीषण अपघात घडला आणि विलास मोरे यांच्यासह पत्नी कल्पना, मुलगी रेणुका आणि मालक भगवान पाटील हे ठार झाले.
जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच -
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरू आहे. यात दुचाकीचे अपघात सर्वाधिक घडत असून, त्यात अनेकांचा बळी जात आहे. आज पुन्हा चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर रोहिणी ते तळेगाव दरम्यान अपघात घडला. त्यात चौघांचा जीव गेला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -रात्र गेली हिशोबात! पोरगं नाही नशिबात; गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका