जळगाव -जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये चार जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये आई-मुलगा आणि पाहुणा-साळा यांचा समावेश आहे. हे दोन्ही अपघात काही तासांच्या अंतराने झाले. पहिला अपघात जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावाजवळ घडला, तर दुसरा अपघात हा पाचोरा शहराजवळ अंतुर्ली फाट्याजवळ घडला. दिलीप अभिमन कोळी (२९) व अलकाबाई अभिमन कोळी (४५) दोघे रा. आसोदा, ता. जळगाव तसेच नरसिंग भावसिंग परदेशी (५५) रा. दोंडवाडे, ता. जामनेर आणि ईश्वर चुनीलाल बेनाडे (४५) रा. चाळीसगाव, अशी दोन्ही अपघातातील मृतांची नावे आहेत.
नातेवाईकांकडे जाणाऱ्या आई-मुलाचा अपघाती मृत्यू -
पहिला अपघात हा जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावाजवळ १२ जून रोजी सकाळी १० वाजता घडला. भरधाव जाणाऱ्या (एमएची १९ सीवाय ५४७३) क्रमांकाच्या ट्रकने आसोदा येथील दिलीप कोळी व अलकाबाई कोळी यांच्या (एमएच १९ डीसी ६६८७) क्रमांकाच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यात दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक घटनास्थळी सोडून पळ काढला. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. औषधोपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नातेवाईक विनोद कोळी यांच्या तक्रारीवरून अज्ञात ट्रक चालकाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप व अलकाबाई कोळी हे चोपडा तालुक्यातील गलंगी येथे नातेवाईकांकडे जात होते. मात्र, रस्त्यातच त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.