जळगाव- जिल्ह्यात अजून 4 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्हा रुग्णालय प्रशासनाला शुक्रवारी रात्री उशिरा 4 संशयित रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून 41 इतकी झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत असून आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.
जळगाव जिल्ह्यात आणखी 4 कोरोनाबाधित रुग्ण आढळले - जळगाव जिल्ह्यात आणखी 4 कोरोनाबाधित रुग्ण आढळले
जळगाव जिल्हा रुग्णालय प्रशासनाला शुक्रवारी रात्री 4 संशयित रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून 41 इतकी झाली आहे.
![जळगाव जिल्ह्यात आणखी 4 कोरोनाबाधित रुग्ण आढळले Four corona positive found in Jalgaon](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7023238-304-7023238-1588354057462.jpg)
कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे आढळलेल्या तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन केलेल्या संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्यातील 47 व्यक्तींचे तपासणी अहवाल शुक्रवारी रात्री प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 43 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 4 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या 4 व्यक्तींमध्ये अमळनेर येथील एक, जळगावातील जोशीपेठ येथील एक, तर पाचोरा येथील 2 व्यक्तींचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41 इतकी झाली आहे. त्यापैकी 12 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, तर एक रुग्ण कोरोनातून बरा होऊन घरी परतला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील जळगाव शहरासह अमळनेर, पाचोरा आणि भुसावळ शहरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.