जळगाव -जिल्ह्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या अमळनेर शहरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. याठिकाणी सोमवारी पुन्हा 4 रुग्ण नव्याने आढळून आले. त्यामुळे अमळनेरात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना बाधितांची संख्या वाढून 27 इतकी झाली आहे. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 57 वर पोहचली आहे.
अमळनेरात पुन्हा 4 कोरोनाबाधित आढळले; जिल्ह्यातील संख्या पोहचली 57 वर - जळगाव
जळगाव व अमळनेर येथील रुग्णालयात स्वॅब घेतलेल्या 20 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल सोमवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले. यापैकी 16 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर 4 व्यक्तींचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
जळगाव व अमळनेर येथील रुग्णालयात स्वॅब घेतलेल्या 20 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल सोमवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले. यापैकी 16 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर 4 व्यक्तींचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या चारही व्यक्तींमध्ये 31, 43 व 60 वर्षीय 3 महिलांचा तर 48 वर्षीय एका पुरुषाचा समावेश आहे. हे चारही रुग्ण अमळनेर येथील रहिवासी आहेत. निगेटिव्ह व्यक्तींमध्ये 14 व्यक्ती या अमळनेर येथील तर 2 व्यक्ती जळगावच्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 57 इतकी झाली आहे. त्यापैकी 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
एकाच दिवशी 5 रुग्णांची पडली भर-
सोमवारी एकाच दिवशी जळगावातील समतानगरातील एक आणि अमळनेर शहरातील 4 अशा एकूण 5 रुग्णांची भर पडली. धक्कादायक बाब म्हणजे, या सर्वांना आधीच्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली आहे. अमळनेर शहरातील संसर्ग काही केल्या आटोक्यात येत नसल्याने आरोग्य यंत्रणेची कसरत होत आहे. जळगाव, भुसावळ आणि पाचोऱ्यातील परिस्थिती देखील अशीच आहे. या पार्श्वभूमीवर जनतेने लॉक डाऊनचे पालन अधिक गांभीर्याने करण्याची गरज आहे.
दरम्यान, सोमवारी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात नियुक्तीला असलेल्या एका पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. हा पोलीस कर्मचारी सध्या कोरोनाचा उद्रेक झालेल्या मालेगाव शहरात बंदोबस्ताच्या कामी ड्युटीवर आहे. त्यामुळे आतापर्यंत मालेगावात बंदोबस्तावर असलेल्या जळगावातील 2 पोलिसांना कोरोना झाला आहे. यापूर्वी यावल पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.