जळगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी 'टिकटॉक'वर आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणाऱ्या चौघांना रामानंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. मोदीसंदर्भात आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन गट आमनेसामने आले होते. मात्र, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने चौघांना अटक केल्याने तणाव निवळला. जुबेर अकील खाटीक (वय 18), जाफर शकील खाटीक (वय 22), अकबर सलीम सैय्यद (वय 18) व अरबाज शकील सैय्यद (वय 19) अशी अटक केलेल्या चारही संशयित आरोपींची नावे आहेत.
समतानगर परिसरात राहणाऱ्या जुबेर, जाफर, अकबर आणि अरबाज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी टिकटॉकवर आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकाराने संतप्त झालेल्या काही १० ते १२ तरुणांच्या गटाने चौघांच्या शोधार्थ समतानगर गाठले. आक्षेपार्ह व्हिडिओ बनवणाऱ्या चारही तरुणांच्या शोधात काही तरुण फिरत असल्याची वार्ता क्षणातच पसरल्याने तणाव निर्माण झाला. ही बाब रामानंदनगर पोलिसांना समजताच साहाय्यक फौजदार गोपाळ चौधरी, सतीश डोलारे, महेंद्र पाटील, वासुदेव मोरे आदींचे पथक घटनास्थळी पोहचले.