जळगाव -राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची २४ कोटी ६३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. नाशिक येथील अशोक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कंपनीचे मालक अशोक मोतीलाल कटारिया यांच्यासह पाच जणांनी फसवणूक केल्याची तक्रार ईश्वरलाल जैन यांनी केली आहे. त्यावरून जळगावातील शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा -क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कारवाईवर हॅकर मनीष भंगाळेंनी ठेवले बोट; म्हणाले...
..यांच्याविरुद्ध झाला गुन्हा दाखल
हातउसनवारीने दिलेले २४ कोटी ६३ लाख १६ हजार ९५१ रुपये परत न करता फसवणूक केल्याची जैन यांची तक्रार आहे. पैसे परत करण्यासाठी जमिनीचे केलेले अॅग्रिमेंट देखील बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे, जैन यांच्या फिर्यादीवरून नाशिकच्या अशोक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कंपनीचे मालक अशोक मोतीलाल कटारिया, राजेंद्र चिंधुलाल बुरड, स्नेहल सतीश पारख उर्फ स्नेहल मंजीत खत्री, आशिष अशोक कटारिया, सतीश धोंडूलाल पारख (सर्व रा. नाशिक) यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
ईश्वरलाल जैन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कटारिया व जैन यांचे कौटुंबिक, आर्थिक संबंध आहेत. याचा फायदा घेत कटारिया यांनी सन २०१० - ११ व २०१४ - १५ दरम्यान व्यवसायासाठी गरज असल्याचे सांगून वेळोवेळी २४ कोटी रुपये उसनवारीने घेतले. यातील काही रक्कम परत केली. नंतर गजरेनुसार पुन्हा जैन यांच्याकडून उसनवारीने पैसे घेतले होते. जैन यांनी पैसे परत मागितले असता पैसे देण्यास टाळाटाळ केली. यानंतर २ ऑक्टोबर २०१५ रोजी कटारिया हे जैन यांच्या कार्यालयात आले. यावेळी त्यांच्यासोबत राजेंद्र चिंधुलाल बुरड, स्नेहल सतीश पारख उर्फ स्नेहल मंजीत खत्री हे देखील आले होते. त्यांनी काही पैसे परत करण्यासाठी मुदत मागितली. त्यापोटी जमिनीबाबत एक जॉइंट व्हेंचर अॅग्रिमेंट करून घेण्याचे सांगितले. त्या संबंधित कागदपत्रांवर जैन यांच्या स्वाक्षरी घेतल्या. जैन यांनी त्यांच्यावर विश्वास ठेऊन स्वाक्षरी केल्या होत्या. यानंतर जैन यांना मानराज मोटर्स कंपनीस २५ कोटी रुपये द्यायचे असल्याने त्यांनी पुन्हा कटारिया यांच्याकडे बाकी असलेल्या पैशांची मागणी केली. यावेळी कटारियांनी आधी केलेल्या जॉईंट व्हेंचरचा तिसरा पक्ष म्हणून मानराज मोटर्सचे डायरेक्टर अशोक बेदमुथा यांना व्यवहारात आणले. यावेळी पुन्हा एकदा जैन यांनी विश्वास ठेऊन डिड ऑफ असाईनमेंटवर सही केली. त्यापोटी सहा महिन्यांची तोंडी मुदतवाढ कटारिया यांनी मागून घेतली होती.
व्यवहारातील जमिनींवर न्यायालयात दावा
दरम्यान, कटारिया यांनी ज्या जमिनीबाबत कागदपत्र तयार केले होते, त्या जमिनींचा नाशिक न्यायालयात दावा दाखल असल्याचे समोर आले. संबंधित जमिनी शासनाकडे हस्तांतरीत होत्या, तरी देखील त्या ताब्यात असल्याचे भासवून संबंधितांनी जैन यांची फसवणूक केली. कटारिया यांना याबाबत सर्व माहिती असूनही त्यांनी वेळोवेळी जैन यांना खोटे सांगून पैसे परत केले नाहीत. याउलट त्यांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. त्यानुसार जैन यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा -आर्यन खान प्रकरणी मीडिया ट्रायल; आम्हाला बोलायची गरज ठेवली नाही - सत्तार