जळगाव -जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना कोरोना संशयित रुग्णांचे अहवाल उशिरा येत असल्याने माजीमंत्री गिरीश महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच संशयित रुग्णांची तपासणी योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना देत जळगावात कोरोना स्वॅब तपासणी लॅब लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविणार असल्याची माहिती महाजन यांनी दिली.
कोरोना चाचणी अहवाल उशिरा येत असल्याने माजीमंत्री गिरीश महाजनांनी व्यक्त केली नाराजी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन आणि महापौर भारती सोनवणे यांनी रविवारी छत्रपती शाहू महाराज रुग्णालयाला भेट दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन आणि महापौर भारती सोनवणे यांनी रविवारी छत्रपती शाहू महाराज रुग्णालयाला भेट दिली. यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूभाई पटेल, नगरसेवक कैलास सोनवणे, आयुक्त सतीश कुलकर्णी, डॉ. राम रावलानी उपस्थित होते. गिरीश महाजन यांनी सध्या असलेल्या रुग्णांची स्थिती आणि प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची मनपा आयुक्तांकडून माहिती जाणून घेतली. नागरिकांनी रस्त्यावर, बाजारात गर्दी करू नये, सोशल डिस्टसिंगचे पालन व्हावे, यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. महापौर भारती सोनवणे यांनी मनपा प्रशासनाकडून हॉकर्सला बसण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच आमदारांकडून मिळालेल्या निधीतून मनपा रुग्णालय अत्याधुनिक साहित्यांनी सुसज्ज करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वसतिगृह ताब्यात घेणार -
जळगाव शहरात कोरोना संशयित रुग्ण वाढत असून त्यादृष्टीने मनपा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वसतिगृह सध्या रिकामे असून त्याठिकाणी गाद्या, उशी व इतर साहित्याची व्यवस्था तात्काळ करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना महापौर व आयुक्त यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
बाजार रोटेशन पद्धतीने भरवण्याची सूचना -
बाजार समितीमध्ये दररोज सकाळी भाजीपाला व फळे विक्रेते, हॉकर्स, खरेदीदार, नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. भाजीपाला, धान्य, फळे, कांदे-बटाटे यांचे व्यवहार वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित करून ते रोटेशन पध्दतीने करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येणार असल्याचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात कोरोना संशयित रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. रुग्ण वाढत असले तरी संशयितांचे स्वॅब घेऊन त्यांचे अहवाल येण्यास उशीर होत आहे. कोरोनाची लक्षणे असलेला रुग्ण तपासणीसाठी आल्यास रुग्णालयात योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. जिल्ह्यात कोरोना स्वॅब तपासणी लॅब सुरू करण्यास मंजुरी मिळाली असली तरी त्याचे काम संथपणे सुरू आहे. जळगावसह प्रत्येक जिल्ह्यात लॅब सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठविणार असून स्वतः त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.