जळगाव - कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या जळगावातील जैन उद्योग समूहातर्फे यावर्षीही पोळा सण उत्साहाने साजरा करण्यात आला. यामध्ये विदेशी पाहुण्यांनीही सहभाग घेतला. यावेळी महाराष्ट्राच्या उत्सव संस्कृतीने विदेशी पाहुणे भारावून गेले होते. वर्षभर शेतात आपल्या मालकासोबत राब राब राबणाऱ्या सर्जा आणि राजाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा होणारा बैलपोळ्याचा सण शुक्रवारी जळगाव जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जळगावात विदेशी पाहुण्यांनी लुटला बैल पोळ्याचा आनंद
बैलपोळ्याची ही संस्कृती विदेशी पाहुण्यांनीही अनुभवली. विदेशी पाहुण्यांची पावले ढोल ताशांच्या तालावर थिरकली. जैन इरिगेशनच्या जैन हिल्स परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहाने पोळा साजरा झाला. बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात आली होती.
पोळ्याच्या सोहळ्यात सुमारे पाचशेच्यावर शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांसह भाग घेतला. यावेळी सालदारांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. पोळा म्हणजे शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण. या सणात भारतीय संस्कृती परंपरेचे रुप अनुभवायला मिळते. बैलपोळ्याची ही संस्कृती विदेशी पाहुण्यांनीही अनुभवली. विदेशी पाहुण्यांन्याची पावले ढोल ताशांच्या तालावर थिरकली. जैन इरिगेशनच्या जैन हिल्स परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहाने पोळा साजरा झाला. बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये अग्रस्थानी सालदारांना घोड्यांवर बसविले होते. रंगीबेरंगी झुलसह सजावट केलेल्या बैलजोड्या ऐटीत मिरवणुकीत चालत होत्या. विदेशी नागरिकांनी पावरी वाद्यावर शेतकरी व सालदारांसह ठेका धरला. पोळ्याच्या श्रवणीय संगीताने यावेळी आनंदी आणि उत्साहाचे वातावरण झाले होते. बैल जोड्यांचे विधीवत पूजन, सप्तधान्याचे पूजन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन यांच्याहस्ते करण्यात आले. यानंतर पूरणपोळींचा नैवेद्य बैलांना भरविण्यात आला.
दरम्यान, महाराष्ट्राची उत्सव संस्कृती अतिशय सुंदर असून आम्हाला ही संस्कृती अनुभवायला मिळाली, हे आमचे भाग्य आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी विदेशी पाहुण्यांनी दिली.