जळगाव - जिल्ह्यातील चोपडा शहरात काठेवाडी समाजबांधवांच्या उघड्यावरील निवासाच्या ठिकाणी अचानक आग लागली. चोपडा शहरातील बोरोले नगर परिसरात ही घटना घडली आहे. या आगीत चाऱ्यांच्या 5 हजार पेंडी तसेच गहू आणि मक्याचा भुसा देखील मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाला आहे. या घटनेत सुदैवाने गायी बचावल्या आहेत. संसारोपयोगी साहित्य देखील जळाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत.
चोपडा शहरातील बोरोले नगर परिसरातील काठेवाडी समाजातील निवासाच्या ठिकाणी दुपारी अचानक आग लागली. वाऱ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केल्याने काही झोपड्या, गुरांच्या चाऱ्याच्या 5 हजार पेंड्या, गहू व मक्याचा भुसा जळून खाक झाला. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी समयसूचकता साधून गुरांना घटनास्थळावरून सोडून दूर सुरक्षित ठिकाणी नेले. अन्यथा ही गुरांचा होरपळून मृत्यू झाला असता. झोपड्यांमधील लोकांनादेखील वेळीच दूर नेल्याने अनर्थ टळला.