जळगाव - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हाेणाऱ्या भाजीपाला लिलावात गर्दी कमी करून साेशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी वारंवार सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याला व्यापाऱ्यांनी न जुमानता गर्दी करून लिलाव करणे सुरूच ठेवले. अखेर शनिवारी जिल्हाधिकारी व पाेलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष सदर ठिकाणी भेट दिली. तेव्हा त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे आणि प्रशासनाच्या निर्देशांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी पाच घाऊक व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. या व्यापाऱ्यांविरोधात एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्यांचा परवाना दि. १४ एप्रिलपर्यंत निलंबित करण्यात आला आहे.
हेही वाचा...कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘सोशल डिस्टंसिंग’चा अभिनव उपक्रम
कृषी उत्पन्न बाजार समितीला काेराेना विषाणूचा संसर्गजन्य राेगाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी धान्य खरेदी-विक्री व भाजीपाला खरेदी, विक्री करण्यासाठी एकाच वेळी १० पेक्षा अधिक नसतील एवढ्या लाेकांना प्रवेश देण्याबाबत कळवण्यात आले आहे. टप्प्याटप्याने व्यवहार सुरू ठेवण्याबाबत तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीने याेग्य ती कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने शनिवारी जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे व पाेलीस अधीक्षक डाॅ. पंजाबराव उगले यांनी बाजार समितीतील भाजीपाला मार्केटमध्ये पाहणी केली. त्यांना काही व्यक्ती किरकाेळ भाजीपाला खरेदी करून घेऊन जाताना दिसले. त्यांना दाेघांनी भाजीपाला काेठून खरेदी केला, याबाबत विचारणा केली. त्यांनी भाजीपाला मार्केटमधून खरेदी केल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकारी व पाेलीस अधीक्षकांनी सभापती कैलास चाैधरी यांना बाेलावून किरकाेळ भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या.