जळगाव -जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे पहिले खासगी केंद्र सुरू झाले आहे. जळगाव शहरातील आकाशवाणी चौक परिसरात असलेल्या डॉ. राजेश पाटील यांच्या विश्वप्रभा हॉस्पिटलमध्ये हे केंद्र सुरू असून, नागरिकांना सशुल्क लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी दररोज 500 ते 600 नागरिकांना कोवॅक्सिनची लस दिली जात आहे. गेल्या आठवडाभरात या केंद्रावर 3 हजारांहून अधिक नागरिकांना लसीकरण झाले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा टक्का वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. राज्य सरकारकडून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काही तांत्रिक अडचणी आणि लसीची पुरेशी उपलब्धता होत नसल्यामुळे लसीकरणाचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही. अशा परिस्थितीत आता खासगी रुग्णालयांमधून नागरिकांना कोरोनाची लस मिळण्यास सुरुवात झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. जळगावात डॉ. राजेश पाटील यांच्या विश्वप्रभा हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरणाचे खासगी केंद्र आठवडाभरापूर्वी सुरू झाले आहे. डॉ. पाटील यांनी कोवॅक्सिनची लस उपलब्ध केली असून, जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक परवानगी घेऊन सशुल्क लसीकरणाला प्रारंभ केला आहे.
जिल्ह्यात 32 शासकीय लसीकरण केंद्र-
जळगाव जिल्ह्यात सध्या लसींचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने खासगी केंद्रांवरील लसीकरण थांबवण्यात आले आहे. केवळ जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, महापालिका व नगरपालिका रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. लसींची उपलब्धता ज्याप्रमाणे होत आहे, तसे लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 85 हजार 997 जणांना पहिला तर 1 लाख 15 हजार 533 जणांना कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात 32 शासकीय लसीकरण केंद्रांव्यतिरिक्त डॉ. राजेश पाटील यांच्या विश्वप्रभा हॉस्पिटलमध्ये असलेल्या खासगी केंद्रावर लसीकरण होत आहे. याठिकाणी नागरिकांना 1300 रुपयात कोवॅक्सिनची लस मिळत आहे.
हेही वाचा -सुशांत सिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला एनसीबीकडून अटक