जळगाव - जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोना विशेष कक्षात संशयित म्हणून दाखल झालेल्या एका रुग्णाचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळला आहे. या वृत्तास जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दुजोरा दिलाय. संबंधित व्यक्ती 49 वर्षाची आहे.
कोरोनाचा जळगावात शिरकाव; पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ - jalgaon corona news
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोना विशेष कक्षात संशयित म्हणून दाखल झालेल्या एका रुग्णाचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळला आहे.
कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने संबंधिताला काल जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्याचा अहवाल आज रात्री रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झालाय.
आतापर्यंत जिल्ह्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, आता पहिल्या रुग्णाची नोंद झाली असून यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 14 मार्चला पहिला कोरोना संशयित रुग्ण दाखल झाला होता. परंतु, वैद्यकीय तपासणीअंती त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. आता पहिला रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण जळगाव शहरातील रहिवासी असला तरीही तो परदेशातून आला आहे, की एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोनाची लागण झाली आहे, याबाबत अद्याप प्रशासनाने स्पष्ट माहिती दिलेली नाही.