जळगाव -रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या चार भावंडांच्या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी सात दिवसानंतर पहिल्या संशयित आरोपीस अटक केली आहे. महेंद्र सीताराम बारेला (वय 19 वर्षे, रा. केऱ्हाळा, ता रावेर), असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. येणाऱ्या 60 दिवसांच्या आत न्यायालयात दोषाराेपपत्र सादर केले जाईल, असे मत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी व्यक्त केले.
बोरखेडा रस्त्यावर एका शेतातील खोलीत एक 13 वर्षीय मुलीसह तीन बालकांची हत्या झाल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या घटनेची चर्चा राज्यभर सुरू झाली. गेल्या सात दिवसांपासून पोलीस यंत्रणा तपासात लागलेली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला तीन अल्पवयीन मुलांची संशयित म्हणून नावे घेतल्यामुळे त्या दिवसापासून या तिघांची चौकशी सुरू आहे. तर गुरुवारी (दि. 22 ऑक्टोबर) पोलिसांनी 19 वर्षीय तरुणास अटक केली. हा तरुण पहिल्या दिवसापासून बेपत्ता होता. दोन दिवसांपूर्वीच त्याचे नाव समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी पुरावे गोळा केले. वैज्ञानिक व तांत्रिक पुराव्यांच्या सबळ पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.