जळगाव - फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून नंतर संबधित व्यक्तीचे फोटो, व्हिडिओचा गैरवापर करुन आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला. यानंतर थेट संबंधितास धमकावून खंडणी वसुल केल्याचा खळबळजनक प्रकार ११ ते १२ फेब्रुवारी दरम्यान शहरात घडला आहे. यात एका वकिलाकडून खंडणी वसूल करण्यात आली आहे.
आक्षेपार्ह व्हिडिओ केला तयार -
प्रशांत नाना बाविस्कर (वय ३१, रा. गणेश कॉलनी) यांच्याकडून खंडणी वसूल करण्यात आली आहे. बाविस्कर हे वकील आहेत. ११ फेब्रुवारी रोजी त्यांच्या फेसबुकवर निशा शर्मा नावाच्या मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. ही रिक्वेस्ट बाविस्कर यांनी स्विकारल्यानंतर काही वेळ दोघांमध्ये चॅटींग झाले. यानंतर समोरील व्यक्तीने बाविस्कर यांच्या फोटोचा गैरवापर करुन एक आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ बाविस्कर यांच्या वैयक्तीक व्हॉटसअॅप नंबरवर पाटवून त्यांना धमकावणे सुरू केले. हा व्हिडिओ व्हायरल करुन बदनामी करण्याच्या धमकी दिली.
आधी फेसबुकवर पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट अन् नंतर आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून उकळली खंडणी - फेसबुकवर पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून उकळली खंडणी
फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून नंतर संबधित व्यक्तीचे फोटो, व्हिडिओचा गैरवापर करुन आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला. यानंतर थेट संबंधितास धमकावून खंडणी वसुल केल्याचा खळबळजनक प्रकार जळगावमध्ये समोर आला आहे.
जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -
बाविस्कर यांना ७०६४४३०७०३ व ९६८०८५१४५४ या दोन क्रमांकावरुन सातत्याने व्हिडिओ शेअर करुन धमक्या दिल्या जात होत्या. यानंतर त्यांना खंडणी मागितली गेली. त्यानुसार बाविस्कर यांनी दिवसभरात ७ हजार ४९९ रुपयांची खंडणी दिली. यानंतरही धमक्या सुरूच होत्या. अखेर बाविस्कर यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार संबधित मोबाईल क्रमांक धारकांवर खंडणीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विलास शेंडे तपास करीत आहेत.