जळगाव -मध्यरात्रीच्या सुमारास घराला अचानक आग लागून पती-पत्नीचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गारखेडा या गावी सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली. उत्तम श्रावण चौधरी (वय 45) आणि वैशाली उत्तम चौधरी (42) अशी आगीत होरपळून मृत्यूमुखी पडलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त होत आहे.
चौधरी दाम्पत्य हे हातमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे ते झोपले. त्यानंतर मध्यरात्र उलटल्यावर रात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या घराला आग लागली. त्यात चौधरी दाम्पत्याचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेबाबत जामनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
ट्रक चालकाने ग्रामस्थांना दिली माहिती -
चौधरी दाम्पत्याच्या घराला आग लागल्यानंतर एक ट्रकचालक ट्रक घेऊन रस्त्याने जात होता. त्याने आगीचे दृश्य पाहिल्यानंतर गावातील लोकांना झोपेतून उठवून त्याने घटनेची माहिती दिली. नंतर ग्रामस्थांनी धाव घेत, मदतकार्याला सुरुवात केली. पण घराचा दरवाजा आतून बंद असल्याने चौधरी दाम्पत्याला वेळीच वाचवता आले नाही. घर लाकडी असल्याने आग भडकली होती. दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. चौधरी दाम्पत्याला एक विवाहित मुलगी व एक मुलगा आहे.