जळगाव - शहरातील महाबळ चौकातील मानस प्लाझा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका बंद घराला शनिवारी सकाळी १० वाजता अचानक आग लागली. सुदैवाने अवघ्या १० ते १५ मिनिटात अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले. आग आटोक्यात आली नसती तर इमारतीवर असलेला मोबाईल टॉवर जळून मोठे नुकसान झाले असते.
जळगावात बंद घराला आग; संसारोपयोगी वस्तू जळून खाक - अग्निशमन दल
महावितरणमधील सेवानिवृत्त अधिकारी दिलीप लाठी यांच्या घराला आग लागली. या आगीत संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
महावितरणमधील सेवानिवृत्त अधिकारी दिलीप लाठी यांच्या घराला ही आग लागली. दिलीप लाठी हे त्यांची पत्नी अॅड. सरोज व मुलगा विकास यांच्यासोबत या इमारतीत वास्तव्यास आहेत. त्यांचा दुसरा मुलगा विपुल नोकरी निमित्ताने नाशिकला राहतो. लाठी कुटुंबीय ३ ते ४ दिवसांपूर्वी नाशिकला गेले. त्यामुळे घर बंद होते. या आगीत घरातील टीव्ही, एसी, पंखे या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह लाकडी कपाट, गाद्या व कपडे जळून खाक झाले. आगीमुळे घराच्या छताची पीओपीही जळाली आहे. लाठी यांच्या शेजाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत घरातील गॅस सिलिंडर तत्काळ हलविल्यानेही अनर्थ टळला.
आगीची माहिती मिळताच अवघ्या १० ते १५ मिनिटात अग्निशमन बंबासह अधिकारी शशिकांत बारी, रोहिदास चौधरी, अश्वजित घरडे, प्रकाश चव्हाण, प्रदीप धनगर यांनी घटनास्थळी पोहोचले. आगीचे स्वरुप पाहताच कर्मचाऱ्यांनी घराचे कुलूप तोडून मागच्या बाजूने पाण्याचा मारा केला. त्यानंतर काही वेळातच आग नियंत्रणात आणली. दरम्यान, आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र, शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.