जळगाव -जिल्ह्यातील पाचोरा येथील एका हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. थर्टीफर्स्टसाठी हॉटेलवर केलेल्या विद्युत रोषणाईमुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या दुर्घटनेत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले असून, व्यावसायिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. थर्टीफर्स्टच्या आदल्या रात्रीच ही घटना घडल्याने हॉटेल व्यावसायिकावर संकट कोसळले आहे.
पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सुरेश मराठे यांचे भाग्यलक्ष्मी हॉटेल आहे. थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर मराठे यांनी हॉटेलवर विद्युत रोषणाई केलेली होती. विद्युत रोषणाईमुळे शॉर्टसर्किट होऊन बुधवारी रात्री हॉटेलला आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. ही बाब लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न केले. परंतु, आग वाढतच असल्याने नगरपालिकेच्या अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हॉटेल मालक सुरेश मराठे यांनीही धाव घेतली.