जळगाव- चिंचोली येथील रेशन दुकानाबाबत पुरवठा शाखेकडे नागरिकांकडून अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुरवठा विभागाने या दुकानाची चौकशी केली असता, अनेक त्रुटी आढळून आल्याने पुरवठा विभागाने दुकान मालकाविरोधात तक्रार दाखल केली. पुरवठा विभागाच्या तक्रारीवरून रेशन दुकान मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
रेशन दुकानदाराचा गरिबाच्या धान्यावर डल्ला, पुरवठा विभागाने दाखवला 'असा' हिसका
चिंचोली येथील रेशन दुकानांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावरून पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दुकानाची चौकशी करुन तक्रार दाखल केली होती.
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर चिंचोली येथील रेशन दुकानांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावरून पुरवठा तपासणी अधिकारी दीपाली ब्राह्मणकर यांनी चिंचोली येथील संजय शालिग्राम घुगे यांच्या रेशन दुकान क्रमांक १७८ ची तपासणी केली. त्यात साठा, वाटप फलक न लावणे, दरपत्रक न लावणे, तक्रार व नाेंदवही नसणे, दक्षता समितीचा बाेर्ड नसणे, एप्रिलमध्ये प्राप्त मालापेक्षा २.२२ क्विंटल गहू व ८ किलाे तांदुळाची ऑनलाईन जास्त वाटप करणे, जादा दराने धान्याची विक्री करणे आदी १२ त्रुटी आढळून आल्या. तसेच या तपासणीत २४ कार्ड धारकांचे लेखी जबाब नोंदवले. तपासणी अधिकारी डिगंबर भिकन जाधव यांनी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीसह जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३,७ व साथीचे राेग अधिनियम १८९७ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुकानाच्या लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून पुरवठा विभागाने लगेच या दुकानाचा धान्य पुरवठा कुसुंबा येथील रेशन दुकानदार हिंमत नामदेव पाटील यांच्या दुकानाकडे वर्ग केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.