जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र लॉकडाऊन आहे. या काळात काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे. जळगाव जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जिल्हा पोलीस दलातर्फे कारवाई करण्यात येत आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत विविध बाबींचे उल्लंघन करणाऱ्यांवर एकूण 3 हजार 242 गुन्हे दाखल झाल्याची माहिती, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिली.
कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 मेपर्यंत देशभर लॉकडाऊन घोषीत केलेला आहे. राज्यात लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत काही निर्बंध घालून दिलेले आहेत. तरीसुद्धा काही नागरिक बेजबाबदारपणे वागत असून, स्वत:बरोबरच दुसऱ्यांच्याही जीवाला धोका निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जळगाव जिल्हा पोलिसांनी कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात विविध कारणांनी भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 269, 270 आणि 290 तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा 2 ते 4 सह आपत्ती व्यवस्थापन कलम 54 (4) आदिंचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत 3 हजार 242 गुन्हे दाखल झाले आहेत.