जळगाव - शहर स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासनाने वॉटर ग्रेस कंपनीला ठेका दिला आहे. मात्र, ठेका दिल्यावर 15 दिवसातच स्वच्छतेचा बोजवारा उडाला. त्यामुळे वॉटर ग्रेस कंपनीचा ठेका रद्द करावा, या मागणीवरून गुरुवारी पार पडलेल्या महासभेत सत्ताधारी भाजप आणि सेनेत जोरदार खडाजंगी झाली. मात्र, 15 दिवसातच गुणवत्तेची फुटपट्टी लावून मक्तेदाराकडून ठेका काढून घेणे योग्य होणार नाही, अशा शब्दात भाजपने मक्तेदाराची पाठराखण करत सेनेचा विरोध झुगारुन लावला.
या सभेला महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच सेनेच्या सदस्यांनी शहरातील स्वच्छतेविषयी लक्षवेधी मांडली. शहरात स्वच्छता करण्यासाठी वॉटर ग्रेस कंपनीला ठेका देऊन काही एक उपयोग झालेला नाही. जागोजागी कचरा साचला आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
मक्तेदार स्वच्छतेचे काम योग्यरित्या पार पाडत नसल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. वॉटर ग्रेसऐवजी अन्य दुसऱ्या कंपनीला स्वच्छतेचा ठेका द्यावा, अशी मागणी सेनेच्या सदस्यांनी केली. मात्र, भाजपने मक्तेदाराची पाठराखण करत सेनेची मागणी धुडकावून लावली.