जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू आहे. शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात 52 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यातील सर्वाधिक 20 रुग्ण भुसावळ शहरात आढळले आहेत. त्यापाठोपाठ जळगाव शहरातही 17 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येचा आकडा हा 1 हजार 578 वर पोहोचला आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग थांबत नसल्याने आरोग्य यंत्रणेवर दिवसेंदिवस ताण वाढत चालला आहे. जळगाव शहरासह भुसावळमध्ये कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक झाला आहे. भुसावळात कोरोनाग्रस्त रुग्णांचे त्रिशतक पूर्ण झाले असून जळगाव शहरही त्रिशतकाच्या उंबरठ्यावर आहे. सद्यस्थितीत जळगावात कोरोनाचे 297 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जळगाव शहर 17, जळगाव ग्रामीण 3, भुसावळ 20, अमळनेर 1, चोपडा 2, यावल 1, एरंडोल 2, जामनेर 3, रावेर 1 तसेच पारोळा येथील 2 रुग्णांचा समावेश आहे.