महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना चाचणीच्या अहवालाला उशीर; पाचोऱ्यात 50 संभाव्य रुग्णांनी केला अन्नत्याग! - पाचोऱ्यातील संभाव्य रुग्णांचे अन्नत्याग आंदोलन

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना संभाव्य रुग्ण म्हणून जामनेर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयातील क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, पण अहवाल येण्यास उशीर होत असल्याने 50 संभाव्य रुग्णांनी अन्न त्याग आंदोलन केले.

Pachora corona update
पाचोऱ्यातील संशयित रुग्णांचे अन्नत्याग आंदोलन

By

Published : Jul 16, 2020, 8:59 AM IST

जळगाव-कोरोना चाचणीचे अहवाल उशिराने येत असल्याने संतप्त झालेल्या 50 संभाव्य रुग्णांनी बुधवारी चक्क अन्नत्याग केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये घडली. या घटनेमुळे प्रशासन चांगलेच हादरले होते. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी संतप्त झालेल्या संभाव्य रुग्णांची समजूत काढल्यानंतर दोन तासांनी या वादावर पडदा पडला.

पाचोरा येथील स्थानिक प्रशासनाच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना संभाव्य रुग्ण म्हणून जामनेर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयातील क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याठिकाणी काही जण 7 दिवसांपासून काही तर काही जण 3 ते 4 दिवसांपासून क्वारंटाईन आहेत. मात्र, तपासणी अहवालास विलंब होत असल्याने ते नाराज आहेत.

सध्या शेतीकामाचे दिवस आहेत. ज्या कारणासाठी क्वारंटाइन केले आहे, त्याचा अहवाल लवकर प्राप्त होत नाही. एकीकडे कोरोना संसर्गाची भीती आणि दुसरीकडे घर व शेतीची चिंता, अशा द्विधा मनस्थितीत सापडल्याने संभाव्य रुग्णांची घालमेल होत आहे. याच रागातून बुधवारी क्वारंटाइन सेंटरमधील 50 जणांनी अन्नत्याग केला. संबंधित अधिकाऱ्यांना बोलवा, आमचे अहवाल का उशिराने येत आहेत, अशी विचारणा करत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

या घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी क्वारंटाइन सेंटरमध्ये धाव घेतली. सुमारे दोन तासानंतर अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला. त्यानंतर क्वारंटाइन झालेल्यांनी उशिराने भोजन घेतले.

दरम्यान, राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी जळगाव दौरा केला होता. यावेळी त्यांनी कोरोना चाचणीचे अहवाल 24 तासांच्या आत मिळायला हवेत, असे निर्देश दिले होते. पण त्यानंतरही जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याचे दिसून येत आहे

ABOUT THE AUTHOR

...view details